भाजप दिल्लीतील आपल्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. याबाबत गेल्या तीन दिवसांत तीन वेळा संपर्क साधण्याचा आला, असा आरोप आपचे आमदार राजेश गर्ग यांनी केला आहे.१५ जून रोजी आम्ही धरणे आंदोलन करत असताना एका व्यक्तीने संपर्क साधून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रस्ताव दिल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एका मसाल्याच्या कंपनीत वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगत भाजपमध्ये येण्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा एका वयोवृद्ध व्यक्तीने आपल्या कार्यालयात येऊन भाजपमध्ये यावे, अशी सूचना केली.  यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनीही भाजप आम आदमी पक्षाच्या आमदारांच्या फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.

तामिळनाडूतील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याची स्टालिन यांची टीका
चेन्नई:तामिळनाडूतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत द्रमुकचे नेते एम. के. स्टालिन यांनी सत्तारूढ अभाअद्रमुकवर टीका केली असून सत्तारूढ पक्षाशी संघर्ष करण्यास तयार राहण्याचे आवाहन पक्ष कार्यकर्त्यांना केले आहे.तामिळनाडूमध्ये कायदा आहे पण सुव्यवस्था नाही, असे मत हिंदू मुन्नानीचे नेते रामगोपालन यांनी व्यक्त केले आहे त्याकडे स्टालिन यांनी लक्ष वेधले. या मतावरून राज्यातील स्थिती समोर येते, असेही स्टालिन म्हणाले.ही स्थिती योग्य मार्गावर आणण्याचा दिवस जवळ येत असून कार्यकर्त्यांनी संघर्षांसाठी तयार राहावे, असे आवाहनही स्टालिन यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले.

जद (यू) बंडखोर आमदाराची याचिका फेटाळली
पाटणा:पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे आपले सदस्यत्व रद्द का करू नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस जद(यू)च्या बंडखोर आमदार रेणू कुशवाह यांच्यावर विधानसभा अध्यक्षांनी बजावली होती. त्याला आव्हान देणारी कुशवाह यांची याचिका बुधवारी पाटणा उच्च न्यायालयाने फेटाळली.कुशवाह यांनी योग्य वेळी आव्हान याचिका सादर केलेली नाही, असे स्पष्ट करून न्या. ज्योती सरन यांनी त्यांची याचिका फेटाळली. दोन दिवसांपूर्वी कुशवाह यांनी कारणे दाखवा नोटिशीला आव्हान देणारी याचिका सादर केली होती.

‘अखिलेश यादव यांनी स्वत:चे मूल्यमापन करावे’
 लखनऊ:उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे ज्या खात्यांचा कारभार आहे, त्या खात्यांमधील समस्येला तेच जबाबदार असल्याने मुख्यमंत्र्यांनी प्रथम स्वत:चे मूल्यमापन करावे, असे भाजपने म्हटले आहे.अखिलेश यादव यांनी अलीकडेच एका कनिष्ठ मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून अन्य ११ मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल केला. कायदा आणि सुव्यवस्थेची ढासळलेली स्थिती, वीजटंचाई, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत रकमेचा परतावा आणि बेरोजगारी हे प्रमुख प्रश्न सध्या राज्याला भेडसावत असून ही सर्व खाती मुख्यमंत्र्यांकडे आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी म्हटले आहे.

नागालॅण्डमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपमध्ये विलीन नाही
कोहिमा: नागालॅण्डमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन आमदारांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपमध्ये विलीन झालेला नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे.भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तीन आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्याचा दावा केला असला, तरी तो दिशाभूल करणारा आहे. पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी, जिल्हा प्रतिनिधी अद्यापही एकत्रितच आहेत, असे नागालॅण्डमधील पक्षाचे उपाध्यक्ष एल. शेमडोक आणि सरचिटणीस मियाथो क्रोसे यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ तीन आमदार आणि काही पदाधिकारी भाजपमध्ये गेले आहेत, मात्र बहुसंख्य पदाधिकारी अद्याप पक्षातच आहेत, असे माजी प्रदेशाध्यक्ष नेइबा नदांग यांनी सांगितले.

राज्यसभा निवडणूकीत राजदचा जद(यू)ला अखेर पाठिंबा
पाटणा : राज्यसभेच्या निवडणुकीत सहकार्य करण्याचे आवाहन बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालूप्रसाद यादव यांना केले होते, त्याला लालूप्रसाद यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या निवडणुकीत जद(यू)ला पाठिंबा देण्याचा निर्णय राजदने घेतला आहे.राज्यसभेच्या दोन जागांसाठी बिहारमध्ये गुरुवारी मतदान होणार असून जद(यू)च्या दोन अधिकृत उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय राजदने घेतला आहे.