लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून जारी करण्यात आलेली आचारसंहिता निवडणूक आयोगाने सोमवारी मागे घेतली. आचारसंहितेच्या दोन महिन्यांच्या कालावधीत आयोगाने नवे नौदलप्रमुख आणि नवे लष्करप्रमुख यांची नियुक्ती करण्यास सरकारला मान्यता दिली. मात्र नैसर्गिक वायूच्या किमती वाढविण्याचा निर्णय पुढे ढकलण्याचे आदेश सरकारला दिले.लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक ५ मार्च रोजी जाहीर झाल्यापासून आचारसंहिता जारी करण्यात आली होती. मात्र आता निवडून आलेल्या नव्या सदस्यांची नावे जाहीर केल्याने आचारसंहिता मागे घेत असल्याचे निवडणूक आयोगाने सरकारला कळविले आहे.आचारसंहिता जारी असलेल्या काळात आयोगाने भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेला नव्या बँका सुरू करण्यासाठी परवाने देण्याची मुभा दिली होती. विशिष्ट राज्यातील मतदान पूर्ण होईपर्यंत विजेच्या दरात कोणतेही बदल न करण्याचे आदेशही आयोगाने दिले होते.
पवन चामलिंग बुधवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार
गंगटोक:सलग पाचव्यांदा निवडून येऊन विक्रमाची नोंद करणारे सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग बुधवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.सिक्कीम डेमोकॅट्रिक फ्रण्ट (एसडीएफ) पक्षाला विधानसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळाले असून, पक्षाच्या २२ आमदारांनी पवन चामलिंग यांची नेतेपदी निवड केली आहे. सिक्कीममध्ये १२ डिसेंबर १९९४ पासून चामलिंग यांचे सरकार असून, त्यांनी मुख्यमंत्री म्हणून यापूर्वीच दोन दशके पूर्ण केली आहेत. बुधवारी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ते पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर प्रस्थान करतील
पत्रकारांवर हल्ला : द्रमुकच्या ११ कार्यकर्त्यांना अटक
चेन्नई:द्रमुकचे कोषाध्यक्ष एम. के. स्टालिन यांच्या निवासस्थानाबाहेरच पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या पक्षाच्या ११ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या कार्यकर्त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत सपाटून मार खावा लागल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून स्टालिन यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्याने तामिळनाडूतील राजकीय घडामोडी वेगवान बनल्या आहेत. मात्र पक्षप्रमुख एम. करुणानिधी यांच्या आदेशावरून स्टालिन यांनी राजीनामा मागे घेतला आणि कोलांटउडी मारली.
पटेल राज्यसभेवर?
मुंबई : लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया या मतदारसंघातून पराभूत झालेले राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेवर पक्षाच्या वतीने संधी दिली जाण्याची शक्यता आहे. माजी कृषी राज्यमंत्री तारिक अन्वर हे बिहारमधून लोकसभेर निवडून आले आहेत. अन्वर हे राज्य विधानसभा सदस्यांच्याद्वारे राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या सदस्यत्वाची मुदत ही जुलै २०१६ पर्यंत आहे. लोकसभेवर निवडून आल्याने अन्वर हे राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतील. यामुळे राज्यातील राज्यसभेची एक जागा रिक्त होणार असून, या जागेवर शरद पवार यांचे उजवे हात मानले जाणारे प्रफुल्ल पटेल यांना संधी दिली जाईल. २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यावरही पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे हवाई वाहतूक हे महत्त्वाचे खाते सोपविले होते.  नवी दिल्लीच्या वर्तुळात प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांचे उजवे हात म्हणून ओळखले जातात.

जगभरातील नेत्यांचे मोदींनी आभार मानले
 नवी दिल्ली :  निवडणुकीत  मिळालेल्या यशाबद्दल शुभेच्छा देणाऱ्या जगभरातील नेत्यांचे नरेंद्र मोदी यांनी आभार मानले असून, जपान, रशिया आणि नेपाळ या देशांबरोबर उत्तम संबंध स्थापन करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोदी यांनी ट्विटरद्वारे जगभरातील नेत्यांचे आभार मानले आहेत. मात्र अद्याप त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांचा उल्लेख केलेला नाही. ओबामा यांनी मोदी यांना दूरध्वनी केला, तर केरी यांनी ट्विटरद्वारे त्यांचे अभिनंदन केले. मोदी यांनी जपान, रशिया, स्पेन, नेपाळ, कॅनडा, जर्मनी या देशांच्या नेत्यांसह संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस आणि तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांचे आभार मानले आहेत.
दिल्लीस्थित गुजराती समाजातर्फे मोदींचा सत्कार
नवी दिल्ली : फटाक्यांची आतषबाजी आणि ढोकळा, फाफडा अशा गुजराती पदार्थाचे वाटप करून नरेंद्र मोदी यांचा विजय साजरा करणाऱ्या दिल्लीस्थित गुजराती समाजाने आता मोदी यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्याचे ठरविले आहे.
दिल्लीतील द्वारका, गुजरात विहार, सिव्हिल लाइन्स, जहांगीरपुरी आणि पश्चिम विहार परिसरात १.२५ लाखांहून अधिक गुजराती समाजाचे वास्तव्य आहे. नवरात्रोत्सवात गरबा आणि मकरसंक्रांतीचा उत्सव या समाजाच्या वतीने दरवर्षी साजरा करण्यात येतो. मात्र १६ मेनंतर येथील गुजराती समाजातील प्रत्येक घरात महोत्सवाचे वातावरण आहे. मोदी यांनी निवडणुकीत जे यश मिळविले ते साजरे केले जात आहे. मोदी आता लवकरच पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याने त्यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्याचे आम्ही ठरविले आहे, असे दिल्ली गुजराती समाजाचे अध्यक्ष मोहित पारिख यांनी सांगितले.