लोकसभा निवडणुकीच्या आठव्या टप्प्यातील मतदान बुधवारी उत्साहात पार पडले. पश्चिम बंगाल आणि सीमांध्रमधील मतदारांनी मतदानाला भरभरून प्रतिसाद दिला. उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश येथेही मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. पश्चिम बंगालमध्ये दुपारी चार वाजेपर्यंत ८० टक्के मतदान झाले होते, तर सीमांध्रमध्ये ७१ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील एका मतदान केंद्राबाहेर पोलीसांनी केलेल्या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे मतदानाला गोलबोट लागले.
आठव्या टप्प्यामध्ये ६४ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. या टप्प्यात उत्तर प्रदेशातील १५, उत्तराखंडमधील ५, सीमांध्रमधील २५, बिहारमधील ७, पश्चिम बंगालमधील ६, हिमाचल प्रदेशातील ४ आणि जम्मू काश्मीरमधील २ जागांसाठी मतदान झाले. एकूण १७३७ उमेदवार या टप्प्यात निवडणुकीच्या रिंगणात होते.
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी मतदारसंघातही आजच मतदान झाले. या मतदारसंघात तिरंगी लढतीमुळे चुरस निर्माण झाली आहे. राहुल गांधी यांच्यासमोर भाजपच्या स्मृती इराणी आणि आपचे कुमार विश्वास यांचे आव्हान आहे.
सुलतानपूरमधील भाजपकडून वरूण गांधी मैदानात आहेत. त्यांचेही भवितव्य आजच मतदान यंत्रात बंद झाले. वरूण गांधी यांच्यासमोर कॉंग्रेसच्या अमिता सिंग यांचे आव्हान आहे. भाजपने या मतदारसंघातून वरूण गांधी यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे चुरस निर्माण झाली आहे.
स्वतंत्र भारतातील पहिले मतदार असलेल्या ९७ वर्षांच्या शाम शरण नेगी यांनीही हिमाचल प्रदेशात आपला मतदानाचा हक्क बजावला. देशातील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. नेगी स्वतः १९५१ पासून प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावत आहेत.