राज्यात लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा आज पार पडला. कोकणात मुंबई ठाण्याबरोबरच रायगड लोकसभा मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. येथे ६४ टक्के मतदान झाले. विद्यमान खासदार अनंत गीते आणि जलसंपदामंत्री सुनिल तटकरे यांच्यासह १० उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. मुरुड आणि पेण येथील निवडक प्रकार वगळता संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली.
मतदान जनजागृतीचा प्रभाव मतदारसंघात दिसून आला. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी मतदानाच्या टक्केवारी १० ते १२ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. सकाळी ७  वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. सकाळच्रा पहिल्या दोन तासात ९ टक्के मतदान झाले होते, मात्र त्यानंतर हळूहळू मतदानाचा टक्का वाढला.
रायगड लोकसभा मतदारसंघात सर्वत्र शांततेत मतदानाची नोंद झाली असली तरी मुरुड आणि पेण तालुक्यात मतदानाला गालबोट लागले आहे. मुरुड तालुक्यात आरावी भालगाव येथे बॅनर फाडल्याच्या संशयावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे, तर पेण तालुक्यातील रावे येथे मतदान केंद्रासमोर शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलीसांनी हस्तक्षेप करून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर जैन, नरेश गावंड, संजय जांभळे, रषाद मुजावार, प्रमोद पाटील आणि आमदार विजय शिवतरे यांच्या विरोधात तर काँग्रेसच्या वैकूंठ पाटील आणि इतर तिघांविरोधात मारहाण करणे, बेकायदेशीर जमाव करणे आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१९ मतदानयंत्रांमध्ये
तांत्रिक बिघाड
अलिबाग : रायगड-रत्नागिरी मतदारसंघात १९ मतदानयंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याने ती बदलण्यात आली. यात गुहागरमध्ये ३, अलिबाग १, दापोली ५, महाड ८ आणि पेणमधील २ मतदानयंत्राचा समावेश आहे.