पैसे वाटपाचे प्रकार, काही केंद्रांवर मतदान यंत्रातील बिघाड अशा काही घटनांचा अपवाद वगळता उत्तर महाराष्ट्रात सहा जागांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सर्वाधिक मतदान दिंडोरी व नंदुरबार मतदारसंघात सुमारे ६५ टक्के तर सर्वात कमी ५६ टक्के मतदान जळगाव मतदारसंघात झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत सर्व मतदारसंघांमध्ये १० ते १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. छगन भुजबळ, माणिकराव गावित, हरिश्चंद्र चव्हाण अशा दिग्गजांसह एकूण ९७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
सकाळपासून मतदारांमध्ये मतदानासाठी प्रचंड उत्साह पहावयास मिळाला. नाशिक मतदारसंघात १५ उमेदवार रिंगणात असले तरी काँग्रेस आघाडीतर्फे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ, महायुतीचे हेमंत गोडसे आणि मनसेचे डॉ. प्रदीप पवार यांच्यात कडवी झुंज आहे. गुरूवारी सकाळी भद्रकाली भागात काँग्रेसचे माजी नगरसेवक बबलु पठाण यांना पैसे वाटत असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली. यावेळी पोलिसांनी पठाणला चोपही दिल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात आले. नाशिक व दिंडोरी मतदारसंघात काही ठिकाणी यंत्रात बिघाड झाल्यामुळे काही काळ मतदान थांबवावे लागले.
धुळे मतदारसंघात सुमारे ५८ टक्के मतदान झाले. जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खा. ए. टी. पाटील आणि आघाडीचे सतीश पाटील यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. नंदुरबार मतदारसंघात सुमारे ६५ टक्के मतदान झाले आहे.
*नाशिक मतदारसंघ ६० टक्के
*दिंडोरी मतदारसंघ ६५ टक्के
*धुळे मतदारसंघ ५८ टक्के
*जळगाव मतदारसंघ ५६ टक्के
*रावेर मतदारसंघ ५८ टक्के
*नंदुरबार मतदारसंघ ६५ टक्के

घोळामुळे हजारो नागरिक मतदानापासून वंचित
मतदार यादीतील घोळामुळे नाशिकमध्ये हजारो नागरिकांना मतदानापासून वंचित रहावे लागले. पुणे येथे घडलेल्या प्रकाराची नाशिकमध्ये पुनरावृत्ती झाली. या संदर्भात निवडणूक यंत्रणेने ‘मतदार यादीत नांव असणाऱ्यांना केवळ मतदान करता येईल’ असे स्पष्ट केले होते. यामुळे मतदार ओळखपत्र असुनही यादीत नांव नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना मतदान करता आले नाही. मयत मतदारांची नांवे यादीत तर जिवंत मतदारांची नांवे गहाळ, दुबार नांवेही कायम, अनेकांची यादीत नाव असली तरी त्यासमोर ‘डिलीट’ अथवा ‘स्थलांतरीत’चा मारलेला शिक्का, राजकीय पक्षांकडील यादीत नांव आहे, पण मतदान केंद्रातील यादीत नाव नाही. अशा चित्र-विचित्र प्रकारांमुळे हजारो नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. एकटय़ा नाशिक मध्य मतदारसंघातील एक ते दीड लाख मतदारांची नांवे वगळण्यात आल्याची तक्रार शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केली. कोणतीही शहानिशा न करता विशिष्ट समाज व वर्गाची नांवे कमी केल्यामुळे यामागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोपही केला जात आहे. मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्यांची कठोर चौकशी करून त्यांना शासन करावे अशी मागणीही करण्यात आली आहे.