News Flash

आजी-माजी मुख्यमंत्र्यांची परस्परांवर कुरघोडी

लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची लाज राखल्याने दिल्ली दरबारी वजन वाढलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यातील सर्वसामान्यांची कामे लवकर मार्गी लागावीत, अशी मागणी करीत अप्रत्यक्षपणे

| July 7, 2014 03:37 am

लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसची लाज राखल्याने दिल्ली दरबारी वजन वाढलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यातील सर्वसामान्यांची कामे लवकर मार्गी लागावीत, अशी मागणी करीत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.
पृथ्वीराजबाबा आणि अशोकराव या आजी-माजी मुख्यमंत्र्यांना फारसे कधीच सख्य नव्हते. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘आदर्श’वादी अशोक चव्हाण यांना नांदेडमधून उमेदवारी देण्यास मुख्यमंत्र्यांनी विरोध दर्शविला होता. काँग्रेस नेत्यांनी अशोकरावांना उमेदवारी तर दिलीच पण निवडून येऊन त्यांनी पक्षाची लाज राखली. याशिवाय शेजारील हिंगोली मतदारसंघात राजीव सातव यांच्या विजयात हातभार लावला. प्रदेश काँग्रेसच्या वतीने विभागवार बैठकांचे सध्या आयोजन करण्यात आले असून, दोन दिवसांपूर्वी झालेल्या मराठवाडा विभागीय बैठकीत आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडली नाही.
आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याकरिता पक्षाला आपली प्रतिमा सुधारावी लागेल, असे अशोक चव्हाण यांनी सुनावले. मराठवाडय़ाशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, पण त्यावर निर्णय होत नाहीत. नांदेडला विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय आपल्या कारकिर्दीत झाला, पण पुढे न्यायालयीन प्रक्रियेत सरकारची मदत झाली नाही, असा आक्षेप अशोकरावांनी नोंदविला. नांदेड आयुक्तालयासाठी अशोकराव आग्रही असले तरी त्याची प्रतिक्रिया लातूरमध्ये उमटण्याची शक्यता आहे.
व्यापाऱ्यांमध्ये स्थानिक संस्था करावरून (एल.बी.टी.) प्रचंड नाराजी आहे. या कराबाबत फेरविचार झाला पाहिजे, असे अशोक चव्हाण यांनी सांगताच नांदेडमध्ये या कराला चांगला प्रतिसाद मिळाल्याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. आपलीच सत्ता असलेल्या महापालिकेत उत्पन्न वाढल्याचे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे होते. पक्षाची प्रतिमा बिघडण्यास केंद्राप्रमाणेच राज्यातील काही घटक जबाबदार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्याचे अप्रत्यक्ष खापर अशोकरावांवर फोडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 3:37 am

Web Title: prithviraj chavan ashok chavan congress
Next Stories
1 अर्थसंकल्पात जेटली यांची तारेवरची कसरत
2 नाशकात मनसे फुटीच्या उंबरठय़ावर!
3 श्यामाप्रसाद यांचे योगदान अमूल्य – पंतप्रधान
Just Now!
X