भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शनला अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल यांच्याबाबत जी वक्तव्ये केली होती, ती सर्व वक्तव्ये पटेल यांनी फेटाळली असून, जर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण त्यांच्या घरी गेल्याचे त्यांनी सिद्ध केले तर आपण सार्वजनिक जीवनाचा त्याग करू असे पटेल म्हणाले. मोदी यांनी दूरदर्शनला दिलेली मुलाखत आक्षेपार्ह किंवा वाद निर्माण करणारी वक्तव्ये कापल्याने वादग्रस्त ठरली होती. ‘अहमदभाई हे काँग्रेस पक्षातील आपले चांगले मित्र आहेत व त्यांच्याशी आपली चांगली मत्री आहे, ती तशीच राहावी, पण अलीकडे ते माझे फोन कॉल घेत नाहीत’, असे मोदींनी मुलाखतीत म्हटले होते. मोदींकडे आपण कधी काहीही मागितले नाही. जे अडवाणीजींना जेवायला बोलावत नाहीत ते मला कसे बोलावतील, असा सवाल त्यांनी केला.