भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे गुजरातमधील अदानी समूहाशी निकटचे संबंध असून, त्यावरच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी तोफ डागली. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि जसवंतसिंग यांना पक्षापासून दूर करण्यात आले, तर अदानी यांच्यासाठी पायघडय़ा अंथरण्यात आल्या, असे राहुल गांधी म्हणाले.
अदानी हे गुजरातमधील बडे उद्योगपती आहेत आणि त्यांच्याप्रमाणेच मोदी सरकार चालणार, त्यांच्यासाठी पायघडय़ा घालण्यात आल्या, मोदी सरकारही तसेच चालणार, असेही राहुल गांधी म्हणाले. गुजरातमध्ये विकासाच्या केवळ गप्पाच मारल्या जातात, एका व्यक्तीला शेकडो एकर जमीन विनामूल्य दिली जाते आणि त्याला त्यावर हवे ते करण्याची मुभाही दिली जाते, दुसरीकडे शेतकरी आणि कष्टकरी यांना वाऱ्यावर सोडले जाते, असेही गांधी म्हणाले. अदानी समूहाशी मोदी यांचे निकटचे संबंध असल्याचा आरोप राहुल यांनी वारंवार केला होता.
वैवाहिक स्थितीवरून मोदींवर  हल्लाबोल
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर हल्ला चढविण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या विवाहाबाबतच्या मुद्दय़ाचा आधार घेतला. भाजप महिलांच्या सुरक्षेबाबत तावातावाने बोलतो, परंतु निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात आपल्या पत्नीचे नाव नमूद करण्यास मोदी यांना खूप विलंब झाला, असे राहुल गांधी म्हणाले. मोदी यांनी आतापर्यंत किती निवडणुका लढविल्या ते आपल्याला माहिती नाही, मात्र या वेळी त्यांनी प्रथमच आपण विवाहित असल्याचे नमूद केले. दिल्लीत ते महिलांच्या प्रश्नांबद्दल बाता मारतात, परंतु स्वत:च्या पत्नीचे नाव प्रतिज्ञापत्रापर्यंत यापूर्वी पोहोचले नव्हते, असेही गांधी म्हणाले.