सत्ता असताना अनेक महत्त्वाच्या विषयांवर मौन बाळगणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत रौद्र रूप धारण केले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला. देशात जातीय हिंसाचार वाढले असल्याचा दावा करीत या मुद्यावर चर्चेची मागणी करण्यासाठी राहुल गांधी यांनी थेट लोकसभेच्या वेलमध्येच धाव घेतली. राहुल यांच्या जोडीला काँग्रेस, समाजावादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व  आम आदमी पक्षाचे मिळून वीस सदस्य होते.  सत्ताबदल झाल्यानंतर देशात जातीय हिंसाचार वाढल्याचा दावा विरोधकांनी केला. प्रश्नोत्तराचा तास रद्द करून या विषयावर चर्चा घ्यावी, अशी मागणी विरोधक करीत होते.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उत्तर प्रदेशात जातीय हिंसाचाराच्या घटना वाढल्या असल्याचे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने बुधवारच्या अंकात ठळकपणे दिले आहे. त्याची दखल घेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. लोकसभेचे कामकाज सुरू होताच प्रश्नोत्तराचा तास रद्द करून यावर चर्चेची मागणी काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. पण सुमित्रा महाजन यांनी चर्चेस नकार दिला. कामकाज सुरू होण्यापूर्वीच काँग्रेसने प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्याची नोटीस दिल्याचे खरगे म्हणाले. त्यावर संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले की, उगाच नसलेल्या समस्या विरोधकांनी उकरून काढू नयेत.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित होते. त्यामुळे विरोधकांना अजूनच जोर चढला. ‘प्रधानमंत्री जवाब दो’, ‘तानाशाही नही चलेगी’, अशा घोषणा विरोधक देत होते. विरोधकांच्या गोंधळामुळे महाजन यांनी कामकाज काही वेळासाठी तहकूब केले.
संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी सुमित्रा महाजन यांच्यावर थेट शरसंधान केले. लोकसभा अध्यक्षा सर्वाना संधी देत नाहीत. त्या ठरावीक लोकांनाच झुकते माप देतात, असा आक्षेप राहुल गांधी यांनी घेतला. आमचे म्हणणे ऐकले जात नाही. देशातल्या गंभीर समस्येवर आम्हाला बोलायचे आहे. पण सरकार दाद देत नाही. देशात फक्त एकाच व्यक्तीचे (नरेंद्र मोदी) ऐकले जाते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
राहुल यांच्या या टीकेने सत्ताधारी संतप्त झाले. गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, देशात जातीय दंगली वाढल्याच्या वृत्तात तथ्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशहा वा जातीयवादी नाहीत, अशी स्तुतीसुमनेही त्यांनी उधळली.
ज्या व्यक्ती सभागृहात बोलतही नाहीत त्यांनी चर्चेची संधी मिळत नाही अशी तक्रार करणे आश्चर्यकारक आहे. काँग्रेसपुढे अंतर्गत बंडाचा धोका आहे. मात्र त्यासाठी सभागृहाला वेठीस धरता कामा नये किंवा लोकसभा अध्यक्षांवर पक्षपातीपणाचा आरोप करू नये. भविष्यात  काही करून दाखवायचे असेल तर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे, तसेच नेतृत्व कसे करता येईल याकडे लक्ष द्यावे.
– अरुण जेटली, अर्थमंत्री

अडवाणींकडे तक्रार?
संसदेत महत्त्वाच्या मुद्दय़ावर बोलण्यास संधीच मिळत नसल्याची तक्रार काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे केल्याचे मानले जात आहे. लोकसभेत गदारोळ झाल्यानंतर राहुल यांनी अडवाणी यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी आणि अडवाणी समोरासमोर आल्यावर त्यांनी अडवाणी यांच्याकडे लोकसभा अध्यक्षांबाबत तक्रार केली. हा प्रश्न गंभीर आहे मात्र विरोधकांचे वर्तन चुकीचे आहे असे अडवाणी यांनी राहुल गांधी यांच्या निदर्शनास आणून दिले, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
सुमित्रा महाजन यांनी राहुल गांधी यांचे आक्षेप फेटाळून लावले. सर्वाना बोलण्याची समान संधी मी देते. त्यामुळे पक्षपातीपणाचा आरोप चुकीचा आहे, तरीही कोणी आरोप करत असेल आपण काय करणार अशा शब्दांत त्यांनी काँग्रेस गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.