काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात नेतृत्वगुणांचा अभाव असल्याची टीका काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी केल्याने निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी काँग्रेसचे नेते सरसावलेले असतानाच आता भाजपने, राहुल गांधी यांच्यात पंतप्रधानपद भूषविण्याची क्षमताच नसल्याचे मत व्यक्त केल्याने नवा वाद उफाळून येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राहुल गांधी यांच्यात नेतृत्वगुणच नाहीत, हे दिग्विजयसिंग यांचे मत योग्यच आहे. त्यांनी नेतेपदाच्या क्षमतेबद्दल भाष्य केले आहे. त्यामुळे पंतप्रधानपद भूषविण्याची क्षमता राहुल गांधी यांच्यात नाही, हे देशाला कळले पाहिजे, असे भाजपचे नेते शहानवाझ हुसेन यांनी म्हटले आहे.
पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशावर राज्य केले. त्यामुळे कोणतीही जबाबदारी न स्वीकारता आपण राज्य करू शकतो, असा नवा विचार आता नेहरू-गांधी घराण्यात बळावत चालला आहे, असेही हुसेन म्हणाले.
काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २००४ मध्ये राष्ट्रपतींकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. मात्र त्यानंतर त्यांनी ती जबाबदारी डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे सोपविली. कोणतीही जबाबदारी न स्वीकारताच राज्य करा हाच त्या वेळचा विचार आता राहुल गांधी यांच्या मनात घोळत आहे, असेही हुसेन म्हणाले.
गेल्या १० वर्षांपासून ते सत्तेत होते, मात्र त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी नव्हती. टूजी घोटाळ्यात माजी मंत्री ए. राजा यांना कारागृहाची हवा खावी लागली आणि संशयाची सुई डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे वळली. दिग्विजयसिंग यांनीही काँग्रेसमधील हाच नवा विचार सूचित केला आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे काँग्रेस पक्षात खळबळ माजली असून दिग्विजयसिंग यांचे वक्तव्य फारसे महत्त्वाचे नसल्याची सारवासारव काँग्रेस पक्षाकडूनच केली जात आहे. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने, दिग्विजयसिंग यांनी राहुल यांच्याबाबत केलेले वक्तव्य अमान्य केले आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांच्यात नेतृत्वाचे सर्व गुण आहेत आणि त्याबाबत काँग्रेस पक्षात कोणतेही दुमत नाही. राहुल गांधी हे सत्तेसाठी आसुसलेले नाहीत असे आपल्याला म्हणावयाचे होते, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते शकील अहमद यांनी स्पष्ट केले आहे.