पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सन्मानार्थ काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी दहा जनपथ येथे मेजवानीचे आयोजन केले होते. मात्र या मेजवानीस काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी अनुपस्थित राहिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे बुधवारी केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनी ‘राहुल गांधी हे युपीए २ सरकारचा घटक कधीही नव्हते’, असे विधान केले होते.  संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची धुरा कठीण कालखंडात वाहणारे पंतप्रधान निकाल लागल्यानंतर १७ मे रोजी पदभार सोडतील असा अंदाज आहे. ८१ वर्षीय मनमोहन सिंग यांना ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि केंद्रीय मंत्र्यांच्या स्वाक्षऱ्या असलेले सन्मानपत्र आणि मानचिन्ह देण्यात आले. तिसऱ्यांदा पंतप्रधानपद स्वीकारणार नाही हे यापूर्वीच मनमोहन सिंग यांनी जाहीर केले आहे. पंडित जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहिले.
 राहुल यांच्या अनुपस्थितीचे कारण अज्ञातच
राहुल गांधी यांची अनुपस्थिती अनेकांच्या चर्चेचा विषय झाली. याबाबत काँग्रेस नेत्यांना विचारले असता त्यांच्या अनुपस्थितीचे नेमके कारण माहित नसल्याचे अनेकांनी सांगितले. शनिवारीच राहुल यांनी मनमोहन सिंग यांची भेट घेऊन आपण मेजवानीस उपस्थित राहू शकत नसल्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली होती, असे राजीव शुक्ला यांनी सांगितले. राहुल यांच्या गैरहजेरीचे कारण काँग्रेसने आधीच जाहीर करायला हवे होते अशी अपेक्षा नॅशनल कॉन्फरन्सच्या ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली.