लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवासाठी उमेदवारी वाटपात झालेला गोंधळ कारणीभूत असल्याचा अहवाल देऊन ए. के. अ‍ॅन्टोनी समितीने अप्रत्यक्षपणे राहुल गांधीच यांना जबाबदार धरले आहे. पराभवाची समीक्षा करण्यासाठी हायकमांडने माजी केंद्रीयमंत्री ए. के. अ‍ॅन्टोनी याच्या नेतृत्वाखाली समिती नेमली होती. समितीचा अहवाल अ‍ॅन्टोनी यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना सादर केला आहे. पराभवानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येते होते. पराभवाला राहुल गांधी हेच जबाबदार असल्याचा आरोप अनेक ज्येष्ठ नेत्यांनी केला होता. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारी वाटपात झालेला गोंधळ व कमकुवत प्रचारामुळे पराभव झाल्याचा अहवाल अ‍ॅन्टोनी समितीने दिला आहे. विशेष म्हणजे लोकसभा तिकीट वाटपावर सर्वस्वी राहुल गांधी यांचे वर्चस्व होते.
नाव न छापण्याच्या अटीवर काँग्रेसच्या एका केंद्रीय नेत्याने महाराष्ट्राचे उदाहरण देऊन सांगितले की, नांदेड व हिंगोली मतदारसंघासाठी अनुक्रमे अशोक चव्हाण व राजीव सातव यांची उमेदवारी अखेरच्या टप्प्यात घोषित झाली. ते निवडून आले. उलट सर्व दिग्गज पराभूत झालेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये स्थानिक नेत्यांना महत्त्व न देता पक्षनेतृत्वाने उमेदवारी निश्चित केली. हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे सरकार होते. तेथेही बंडखोरी झाली. प्रभावी मोदीलाट, विरोधात गेलेली प्रसारमाध्यमे व प्रचारात आक्रमकता नसणे, ही प्रमुख कारणे अ‍ॅन्टोनी समितीने पराभवाची मीमांसा करताना दिली आहे. अहवालात राहुल गांधी यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न अ‍ॅन्टोनी यांनी केला आहे, परंतु अप्रत्यक्षपणे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाभोवतीच हा अहवाल केंद्रित झाला आहे. विविध राज्यांच्या प्रभारींशी चर्चा करून अ‍ॅन्टोनी समितीने पराभवाची कारणे निश्चित केली.