लोकसभा निवडणुकीत पत्कराव्या लागलेल्या दारुण पराभवाचे खापर पक्षातीलच काही ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर फोडले असतानाच ज्येष्ठ नेते ए. के. अ‍ॅण्टनी यांनी मात्र राहुल गांधी यांची पाठराखण केली आहे. पराभवाला राहुल गांधी जबाबदार नाहीत, असे स्पष्ट करून अ‍ॅण्टनी यांनी, सोनिया आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
पक्षाच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी अ‍ॅण्टनी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल गुरुवारी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना सादर केला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना समितीनेही दुजोरा दिल्याचे या अहवालात म्हटले आहे, अशी चर्चा होती, त्याचेही अहवालात खंडन करण्यात आले
आहे.
अशा प्रकारचे मत या शक्यता आहेत, मात्र वस्तुस्थिती तशी नाही, पक्ष दुबळा व्हावा अशी ज्यांची इच्छा आहे, तेच अशा प्रकारच्या अफवा पसरवत आहेत, असेही अ‍ॅण्टनी म्हणाले. निवडणुकीत काँग्रेसचा पराभव का झाला त्याची कारणे निराळी आहेत, असेही ते म्हणाले. मात्र त्यांनी समितीचे निष्कर्ष अधिक स्पष्टपणे सांगण्यास नकार दिला. पक्षाच्या संपर्क रणनीतीमध्ये दोष होता का, मीडियाला दूषणे देण्यात आली आहेत का, अशा प्रकारच्या प्रश्नांना अ‍ॅण्टनी यांनी उत्तरे देण्याचे टाळले. याबाबत आपण सविस्तर भाष्य करणार नाही, अहवालात काय आहे ते सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले. आम्ही पुन्हा नव्याने उभारी घेऊ, असा विश्वास अ‍ॅण्टनी यांनी व्यक्त करताना १९७७चे उदाहरण दिले. सोनिया आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे पुनरुज्जीवन होईल, असेही ते म्हणाले.
‘पराभवाला माध्यमांचा हातभार’
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाला माध्यमे हा एक घटक कारणीभूत ठरल्याचा निष्कर्ष ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी काढला आहे. विशेषत: इलेक्ट्रॉनिक माध्यमांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. मी जेव्हा मंत्री होतो तेव्हा एक मिनिटदेखील थेट प्रक्षेपण करण्यात आले नाही. मात्र आता एकाच व्यक्तीवर लक्ष केंद्रित आहे, असे त्यांनी मोदींचा नामोल्लेख न करता टोला लगावला.