लोकसभा निवडणुकीत मोदी लाट आणि मनसेसह साऱ्याच पक्षांचे झालेले पानिपत लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीसाठी योजनाबद्ध प्रचार करण्याची भूमिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. त्याचप्रमाणे मुंबई आणि मराठवाडा अशा दोन विभागांतून राज विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत पोहोचावा यासाठी निवडक जागा लढण्याची रणनीती राज यांनी आखली होती. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देताना मनसेने भाजपच्या विरोधात कमी जागा लढविल्या होत्या. तथापि आता विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा लढविण्याकडे राज यांचा कल आहे. मनसेचे ज्येष्ठ पदाधिकारी व आमदारांनी राज्याच्या वेगवेगळ्या भागांचे दौरे करून इच्छुक उमेदवारांच्या याद्या तयार केल्या असून त्याची छाननी करून उमेदवार निवडीचे काम सध्या मनसेत वेगाने सुरु आहे. उमेदवारांना लढण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी येत्या पंधरा दिवसात पहिल्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांना लढण्याचे संकेत दिले जातील असे मनसेच्या एका आमदाराने सांगितले. मराठवाडय़ात मनसेचे पदाधिकारी मोठय़ा प्रमाणात असून मनसेला या ठिकाणी चांगल्या जागा मिळतील असे मनसेच्या निरीक्षकांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे दुसरा मतदारसंघ म्हणून राज यांनी मराठवाडय़ातून निवडणूक लढल्यास त्याचा निश्चित फायदा मनसेच्या उमेदवारांना मिळेल अशी भूमिका यामागे आहे.
या दृष्टिकोनातून मराठवाडय़ातील दोन-तीन मतदारसंघांचा आढवाही घेण्यात आला असून त्या ठिकाणी पक्षबांधणीकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे.  मनसेचा प्रचाराचा राज हेच एकखांबी तंबू असल्याचे लक्षात घेऊन काही आमदार व सरचिणीसांवर प्रचाराचा भार सोपविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी शहरी भागात जवळपास विधानसभेच्या ११० जागा आहेत त्याचप्रमाणे मराठवाडय़ावर मनसे लक्ष केंद्रित करणार असून मनसेचे आमदार बाळा नांदगावकर हे निवडणूक न लढता प्रचारावर लक्ष कें द्रित करणार आहेत. राज यांनी तयार केलेली विकासाची ब्लू प्रिंट जिल्ह्य़ाजिल्ह्य़ात मांडण्यात येणार असून लवकरच राज हे राज्यव्यापी दौरा करणार आहेत.
राज यांच्या ब्लू प्रिंटमध्ये रस्त्यांसह पायाभूत सविधा, उद्योगांची वाढ आणि त्यातून बरोजगारांना मिळणारा रोजगार, शिक्षण, सिंचनासह पाणीपुरवठय़ाच्या योजना आणि शेतीधोरण त्याचप्रमाणे क्रिडा क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचावे याला विशेष महत्त्व देण्यात आल्याचे मनसेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. राज यांनी या ब्लू प्रिंटचा र्सवकष आढावा घेतला असून विकासाचा अजेंडा मांडतानाच राज्य शासन आणि सेना-भाजपवरही राज यांच्या तोफा बरसतील, असे हा पदाधिकारी म्हणाला.