बाळासाहेब आजारी असताना मी रोज मातोश्रीवर जायचो. एक दिवस माझ्यासमोर दोन इटुकले तेलकट वडे त्यांच्यासमोर खाण्यासाठी ठेवण्यात आले. ते पाहून मला वाईट वाटलं, म्हणून मी त्यांना विचारलं, ‘काका, हे काय खाता?’ तर  ते म्हणाले आता हेच रोज माझ्या समोर येतंय त्याला मी काय करू? शेवटी मी रोज चिकन सूप पाठवू का,असे विचारल्यावर त्यांनी पाठवून दे, चव बघतो, असे सांगितले. त्यानंतर शेवटपर्यंत मी बाळासाहेबांना सूप पाठवत होतो. उध्दव स्वत: रूग्णालयात असताना बाळासाहेबांनी मला दूरध्वनी करून तेथे येण्यास सांगितले. मी तेथे एक घरातील  कर्तव्य म्हणून लिलावती रूग्णालयात गेलो. या सगळ्या घटना घडताना ‘खंजीर खुपसल्याचे’ आठवले नाही का, अशा खरपूस शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीतील सभेत उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली.
उध्दव ठाकरे यांनी जरी हा विषय संपवला असल्याचे जाहिर केले असले तरी, या विषयाला स्वल्प, पूर्ण विराम कोठे द्यायचा याचा निर्णय मी घेणार असून आता सुरूवात तुम्ही केली आहे. त्याचा शेवट मीच करणार असे सांगून राज यांनी हा सवाल जबाब कार्यक्रम २१ तारखेपर्यंत सुरूच राहिल, असे सांगत उध्दव ठाकरे यांना प्रतिआव्हान दिले.
लोकसभा निवडणुकीचा काळ आहे अनेक विषय आहेत. पण त्यांनी खंजीरचा विषय काढला त्यामुळे लोकांना आता स्पष्ट काय आहे ते सांगितले पाहिजे असे सांगून राज यांनी उध्दव आजारी असल्यापासून ते बाळासाहेब आजारी असेपर्यंत घडलेल्या घटनांचा परामर्श घेतला. रूग्णालयात मी बसून होतो. उध्दव बरा झाल्यानंतर मी स्वत: गाडी चालवत त्यांना मातोश्रीपर्यंत सोडले. या काळात नाही आठवला त्यांना खंजीर असा खोचक प्रश्न राज यांनी उध्दवला टोमणा मारताना केला. बाळासाहेब हयात असताना मी टोळक्याच्या त्रासाला कंटाळून बाहेर पडलो. त्यांच्या समक्ष पक्ष काढला. कारण माझ्यावर प्रेम करणारी असंख्य माणसे होती, असे सांगत राज यांनी मी मैदान सोडून पळालो नाही हे सूचित केले.