श्रीलंकेच्या मुथ्थया मुरलिधरन याचा ‘दुसरा’ने भलभल्या फलंदाजांची विकेट निघायची तशीच ‘विकेट’ राज यांनी मनसेच्या वर्धापनदिना शिवसेना-भाजपची घेतली आहे. पंतप्रधानपदासाठी मनसेचे खासदार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील, हा राज यांचा ‘मोदी दुसरा’ने शिवसेना घायाळ झाली तर भाजपची त्रधातिरपीट उडाली आहे.
एकीकडे संपूर्ण देशात काँग्रेसच्या विरोधात वातारण आहे तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांची लाट निर्माण करण्यात भाजपला यश आले आहे. अशावेळी महाराष्ट्राच्या पाटा खेळपट्टीवर सेना-भाजप-रिपाई युतीमध्ये स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षासारखे खेळाडू सामिल झाल्यामुळे महायुतीची टीम आता ‘सामना’ जिंकायचेच तेवढी बाकी होती. महायुतीचे कर्णधार उद्धव ठाकरे यांनी नव्या भिडूसाठी जागा नसल्याचे जाहीर केले तर बारावा खेळाडू असलेल्या रिपाईने उद्धव यांच्या भूमिकेचे स्वागत केले. भक्कम फलंदाज असलेल्या भाजपमध्ये थोडीशी चुळबूळ सुरु होती. शंभर टक्के विजयासाठी ‘मॅचफिक्सिंग’ होत असेल तर पहावे म्हणून त्यांनी मनसेच्या राज ठाकरे यांना  साकडे घालण्यास सुरुवात केली. भाजप नेते नितीन गडकरी यांनी यासाठी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये राज यांची भेट घेऊन मोदींसाठी लोकसभा निवडणूकच न लढविण्याची विनंती केली. पाठोपाठ विधान परिषदेच्या ‘रणजी सामन्या’साठी प्रदेश भाजपचे अध्यक्ष व विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांनीही थेट ‘कृष्णभुवन’वर जाऊन राज यांना पाठिंब्याची विनंती केली. खरे तर मनसेचा कर्णधार अष्टपैलू खेळाडू असला तरी त्याची टीम कच्चीच होती. परंतु चलाख कर्णधाराला साजेसा खेळ करत आपले पत्ते खुले न करता राज ठाकरे भाजपच्या नेत्यांना एकेक चेंडू टाकत होते. यामुळे चिडलेल्या महायुतीचे कर्णधार उद्धव यांनी थेट गडकरी यांना थेट तराजू-तागडी घेतलेला ‘व्यापारी’ बनवून टाकले.
यानंतर खेळपट्टी फिरकीला साथ देणार हे ओळखून राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापनदिनी लोकसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर करतानाच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. राज यांच्या या ‘मोदी दुसरा’ने महायुतीची विकेट निघाली. शिवसेना घायाळ झाली तर राज यांना खेळविण्याच्या नादात भाजप घायाळ झाली. राज यांच्या ‘मोदी दुसरा’ने एकाचवेळी ते काँग्रेसच्या बाजुने असल्याच्या टिकेचा मुद्दा निकाली तर निघालाच परंतु सेना-भाजपच्या भक्कम टीममध्ये खिंडार पाडण्यातही ते यशस्वी झाले.