रिपब्लिकन पक्षाला डावलून निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार असून आंबेडकरी विचारांचे मतदार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला या वेळी निश्चितपणे धडा शिकवतील, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे (गवई गट) राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी दिला आहे. मुंबई येथे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी भेट घेऊन परतल्यानंतर आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यात किमान २० जागांवर निवडणूक लढण्याचा इरादा पुन्हा जाहीर केला.
राज्यसभा, विधान परिषद किंवा आता लोकसभेच्या निवडणुकीत बौद्ध समाजाच्या उमेदवाराला तिकीट न देण्याचे धोरण राष्ट्रवादीला घातक ठरणार आहे. आपण अमरावतीतून निश्चितपणे निवडणूक लढणार आहोत. राष्ट्रवादीच्या घडय़ाळ चिन्हावर निवडणूक लढण्यास नकार देऊन आपण रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीला जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. राणा यांनी त्यांच्या पत्नीसाठी खुशाल प्रचार करावा, पण आपला किंवा रिपब्लिकन पक्षाचा वापर करू नये. रवी राणा हे आपले मित्र आहेत. त्यांनी आपल्याला गृहीत धरण्याचा चुकीचा प्रयत्न केला होता. आपल्या राजकीय भूमिकेपासून दूर जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे डॉ. गवई म्हणाले.
आपल्याला राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर घेण्याचा प्रस्ताव नाकारला. अमरावती, उत्तर-पूर्व मुंबई, दक्षिण मुंबई, बुलढाणा, हिंगोली, धुळे या मतदारसंघांसह २० जागांवर रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार उभे करून आंबेडकरी विचारांच्या मतांचे विभाजन टाळण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी अमरावतीत उमेदवार देऊ नये व अकोल्यातून आमचा उमेदवार राहणार नाही. त्यांच्याशी आपण या विषयावर चर्चा करणार आहोत.