नारायण राणे यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपवावे या सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या ठरावापाठोपाठ मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेत्यांनी गुरुवारी पाठ फिरविल्याने राणे यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला आव्हान देण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे मानले जात आहे.
पक्षाच्या दारुण पराभवानंतर प्रदेश काँग्रेसच्या वतीने लढविण्यात आलेल्या सर्व २६ मतदारसंघांचा आढावा घेण्यात येत आहे. आढाव्याचा पहिला दिवस भिवंडीतील कार्यकर्त्यांमधील शिवीगाळीमुळे गाजला. दुसऱ्या दिवशी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार होता. रत्नागिरी काँग्रेसचे अध्यक्ष रमेश कीर हे पदाधिकाऱ्यांसह उपस्थित होते. पण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेतेमंडळी फिरकलीच नाहीत. परिणामी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील आढावा बैठक पुढे ढकलण्यात आली. नारायण राणे उपस्थित नसल्यानेच आजची बैठक झाली नाही, असा दावा रत्नागिरीच्या नेत्यांनी केला. विलासराव देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रीपद मिळाले नाही तेव्हाही राणे यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधात थयथयाट केला होता. मधल्या काळात राणे शांत होते, पण आता पुन्हा त्यांनी उचल घेतलेली दिसते.
मुलाच्या पराभवानंतर राणे यांनी मंत्रिपदाच्या राजीनाम्याचे पत्र मुख्यमंत्र्यांकडे पाठविले होते. पण पक्षाने त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार देऊन मंत्रिमंडळात काम करण्याचा सल्ला दिला. गेल्या शनिवारी राणे आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात गुफ्तगू झाले होते. यानंतरच मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील मोहीम अधिक तीव्र झाली.
मुंबईचा घोळ : प्रदेश काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी मुंबईतील सहाही मतदारसंघांचा आढावा घेण्यात येणार असतानाच मुंबई काँग्रेसच्या वतीने शनिवारी आढाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेश की मुंबई काँग्रेस कोठे मते मांडायची याचा प्रश्न मुंबईतील पदाधिकाऱ्यांना पडला आहे.
मुख्यमंत्री विरोधकांना चपराक
आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा राजीनामा पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी फेटाळला आहे. त्यामुळे राज्यात नेतृत्वबदलाची मागणी करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधी गटाला चपराक बसली आहे. गोगोई यांनी आसाममध्ये पक्षाच्या झालेल्या खराब कामगिरीची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देऊ केला होता.