गेली दोन दशके सत्ता असलेल्या शिवसेनेने मुंबईचा पार बट्टय़ाबोळ केला. शहरातील रस्त्यांवर खड्डय़ांचे साम्राज्य आहे. मुंबईचा धड विकास करणे शक्य झाले नाही ते राज्याचा विकास काय करणार, असा सवाल काँग्रेसने केला आहे.
शिवसेनेच्या व्हिजन डॉक्युमेंटचा समाचार घेताना काँग्रेसने काही सवाल उपस्थित केले आहेत. महिला सक्षमीकरणावर भर देण्यात आला असला तरी शीतल म्हात्रे आणि डॉ. शुभा राऊळ या शिवसेनेच्या नगरसेविकांना त्रास देणाऱ्या स्वपक्षीय आमदाराच्या विरोधात पक्षाने काय कारवाई केली, अशी विचारणा प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. विजेपासून घनकचरा तयार करण्याचे मुंबई महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन परत  दिले आहे. मुंबईची गेल्या दहा वर्षांंमध्ये विविध सर्वेक्षणात पीछेहाटच झाली आहे. या संदर्भात अनेक उदाहरणे काँग्रेसने दिली आहेत. आरक्षणाला कायम विरोध करणाऱ्या शिवसेनेला प्रथमच मागासवर्गीयांची आठवण झाली. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा उल्लेख करणाऱ्या सेनेने आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील स्मारकाबाबत ‘ब्र’सुद्धा काढलेला नाही असे सावंत म्हणाले.