रावेर
रावेर लोकसभा मतदारसंघात प्रत्यक्ष पटावर दिसणाऱ्या उमेदवारांपेक्षा त्यांच्यामागे असलेल्या ज्येष्ठ व्यक्तींमध्येच खरी लढाई असून महायुती आणि आघाडी दोन्ही बाजूकडील प्रतिष्ठा आणि अनुभव पणास लागलेला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार मनीष जैन यांच्यासाठी त्यांचे पिताश्री खा. ईश्वरलाल जैन तर, भाजपच्या रक्षा खडसे यांच्यासाठी त्यांचे सासरे व विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आपली सर्व शक्ती पणास लावली आहे. वरवर पाहता मतदारसंघात महायुती आणि आघाडी या दोघांमध्येच लढत दिसत असली तरी, काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीने लढतीत अधिकच रंग भरला आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघात चोपडा, रावेर, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर आणि बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांचा १९९८ ते १९९९ हा तेरा महिन्यांचा कालावधी वगळता १९९१ पासून या मतदारसंघावर भाजपचेच वर्चस्व आहे. विद्यमान खासदार हरिभाऊ जावळे यांनाच प्रारंभी यावेळीही भाजपची उमेदवारी जाहीर झाली होती. परंतु त्यांच्याविरूध्द कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात केली. आणि अखेरीस एकनाथ खडसे यांच्या स्नुषा व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग सभापती रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली. आपल्या सुनेस उमेदवारी मिळण्यासाठी खडसे यांनी पध्दतशीरपणे विणलेले हे जाळे होते असे म्हणतात. दुसरीकडे या मतदारसंघातून उमेदवारीसाठी सुमारे चार वर्षांपासून काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांनी तयारी सुरू केली होती. आरोग्य शिबीरांच्या माध्यमातून त्यांनी लोकसंपर्कही मोठय़ा प्रमाणावर वाढवला होता. परंतु राष्ट्रवादीने काँग्रेससाठी जागा सोडण्यास नकार देत खा. ईश्वरलाल जैन यांचे पुत्र व माजी आमदार मनीष जैन यांना उमेदवारी दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या डॉ. पाटील यांनी बंडखोरी केली आहे. मात्र स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीला जैन यांच्याशी जुळवून घेणे भाग पडले असले तरी अजूनही अनेक कार्यकर्ते त्यांच्यापासून दूरच आहेत. डॉ. पाटील यांना काँग्रेसच्या बहुतेक पदाधिकाऱ्यांचे त्यांना छुपे समर्थनआहे.  त्यामुळे मनीष जैन यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.  तर, डॉ. पाटील हे आघाडीच्याच मतांमध्ये वाटेकरी होणार असल्याने रक्षा खडसे यांना त्यांची उमेदवारी लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. मूळ उमेदवारांपेक्षा ईश्वरलाल जैन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्येच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या गदारोळात आपचे राजीव शर्मा आपण वेगळे असल्याचे ठसवित आहेत.