रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रिपद मिळावे, यासाठी दबावतंत्राचा भाग म्हणून पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुकीत अधिकच्या जागा मागण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीत १२ ऑगस्टला होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत महायुतीकडून सत्तेत वाटा किती मिळणार, यावरच चर्चा केली जाणार आहे.
महायुतीच्या नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीतील जागावाटपांबाबत प्राथमिक चर्चा झाली. त्याच दरम्यान रिपाइंची स्वतंत्र बैठक झाली. त्यात रामदास आठवले यांना केंद्रात मंत्री करणे, राज्यात महायुती सत्तेवर आल्यानंतर विधान परिषदेच्या चार जागा पक्षाला देणे, सत्तेत वीस टक्के सहभाग, अशा मागण्यांचे ठराव मंजूर करण्यात आले. त्यानंतर शिवसेना-भाजपकडे ५७ जागांची यादी देण्यात आली. त्यात २० राखीव जागांसह मुंबईतील १२ मतदारसंघ मिळावेत, अशी रिपाइंची मागणी आहे. सप्टेंबरमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा आहे. त्यावेळी आपली संधी हुकू नये, म्हणून आठवले यांचे प्रयत्न सुरु आहेत. अधिकच्या जागांची मागणी करुन त्यासाठी युतीवर दबाव आणण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.