देशभरातून लोकसभेच्या २५ जागा लढविण्याचा निर्णय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (के) पक्षाच्या संसदीय मंडळाने घेतला आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवराज मोघा यांच्या अध्यक्षतेखाली सिकंदराबाद (आंध्रप्रदेश) येथे झालेल्या पक्षाच्या सांसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून १३, मध्यप्रदेश १, कनार्टक १, उत्तर प्रदेश २, आंध्रप्रदेश ५ अशा जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.पक्षातर्फे  निवडणुकीची पहिला यादी जाहीर करण्यात आली असून अन्य लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी १९ मार्चला हैदराबाद येथे होणाऱ्या सांसदीय मंडळाच्या सभेत निश्चित करून अंतिम यादी जाहीर करण्यात येईल.
महाराष्ट्रातून फारवर्ड ब्लॉकचे उमेदवार निश्चित झाले असून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवदास लाखदिवे, नाशिकमधून महेश आव्हाड, वर्धेतून डॉ. अंकुश नवले, तर भंडारा-गोंदिया येथून अ‍ॅड. रामदयाल हिरकणे निवडणूक रिंगणात राहणार आहेत. भारतीय बोल्शेविक पार्टी १० जागांवर निवडणूक लढणार असून बोल्शेविक पार्टीचा डाव्या आघाडीला पाठिंबा राहणार आहे. बोल्शेविक पार्टी लोकसभा निवडणुकीत पाच राज्यातील १० जागांवर निवडणूक लढवणार आहे.