दक्षिण मुंबई मतदारसंघात मात्र शिवसेना आणि भाजपमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचा प्रत्यय गुरुवारी आला. युतीतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अरविंद सावंत यांच्यासाठी शिवसैनिक जीवाचे रान करीत असताना भाजप कार्यकर्ते मात्र कुठेच दिसत नव्हते. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान व्हावेत असे मनोमन वाटणाऱ्या रा. स्व. संघाचे कार्यकर्ते मात्र शिवसैनिकांच्या खांद्याला खांदा लावून मतदारांना बाहेर काढण्यासाठी झटत असल्याचे चित्र समोर आले.
गिरगाव परिसरातील जगन्नाथ शंकरशेठ मार्गावर भाजपचे कार्यालय आहे. देशभरात निवडणुकीचेरणशिंग फुंकल्यानंतरही या कार्यालयात साधा एक मिणमिणता दिवाही लावला गेला नाही. इतकेच नव्हे तर मतदानाच्या दिवशीही या कार्यालयात शुकशुकाट होता.