सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगावर लंडनमध्ये टीका केल्याबद्दल परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांच्यावर टीकेची झोड उठविली जात आहे. मात्र आपल्या वक्तव्याचा ज्या पद्धतीने विपर्यास करण्यात आला त्यामुळे देशात आधीच दूषित झालेल्या वातावरणात अधिक भर टाकली गेल्याचे खुर्शिद यांनी म्हटले आहे. देशातील कोणत्याही संस्थेविरुद्ध आपण वक्तव्य केलेले नाही, असे स्पष्टीकरण खुर्शिद यांनी दिले आहे.‘भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने’ या विषयावर लंडनमध्ये आयोजित एका कार्यक्रमात आपण ४५ मिनिटे भाषण केले आणि त्यानंतर १५ मिनिटे श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने आपल्या निवडणूक पद्धतीमध्ये आणि कारभारात कशी सुधारणा केली आहे त्याबाबतची वस्तुस्थिती आपण मांडली, असे खुर्शिद म्हणाले.