‘अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकातील सर्व आरोप निराधार आणि कपोलकल्पित असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचा जोरदार युक्तिवाद पंतप्रधान कार्यालयाने केला आहे. तसेच लेखकाने पुस्तकाच्या खपासाठी तसेच सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी सर्व आरोपबाजी केली असल्याचा आरोपही पंतप्रधान कार्यालयाने केला आहे.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांनी लिहिलेल्या वरील पुस्तकाने देशभरात खळबळ उडाली आहे. या पुस्तकातील काही उतारे प्रसिद्ध झाले असून त्यात पंतप्रधान आजवरचे सर्वात कमजोर पंतप्रधान असल्याचे चित्र रंगवण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान कार्यालयाच्या दैनंदिन कारभारात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी ढवळाढवळ करत होत्या असेही पुस्तकात स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, रविवारी पंतप्रधान कार्यालयाने सर्व आरोप फेटाळून लावत पुस्तकातील सर्व मजकूर निराधार व कपोलकल्पित असल्याचे स्पष्ट केले.
पंतप्रधान कार्यालयाचे प्रवक्ते पंकज पचौरी यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले. बारू स्वत:च्या पुस्तकाची विक्री जोरदार व्हावी व स्वत:ला सवंग लोकप्रियता मिळावी यासाठी हा सर्व बनाव रचत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. सोनिया गांधी पंतप्रधान कार्यालयातील प्रत्येक फाइलची तपासणी करायच्या, हा त्यांचा आरोपही निराधार असल्याचे पचौरी यांनी स्पष्ट केले.
माजी कोळसा सचिवांचीही नाराजी
माजी कोळसा सचिव पी.सी. पारख यांचे ‘क्रुसेडर ऑर कॉन्स्पिरेटर – कोलगेट अँड अदर ट्रथ’ हे पुस्तक सोमवारी प्रकाशित होत आहे. या पुस्तकातही पंतप्रधान हे ‘अत्यंत अल्प अधिकार असलेल्या मंत्रिमंडळाचे नेतृत्व करीत होते’, असे भाष्य पारख यांनी केले आहे. आपल्या राजीनाम्याच्या वेळचा एक प्रसंग त्यांनी या पुस्तकात नमूद केला आहे. राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानांकडे आपण ‘लोकप्रतिनिधींकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपमर्द होण्याबद्दल’ तक्रार केली असता, उद्वीग्न झालेल्या पंतप्रधानांनी मी तर अशा बाबींचा रोजच सामना करतो आणि देशाच्या हितासाठी अशा गोष्टी सहन करायलाच हव्यात असा उपदेश केला, असे पारख यांनी म्हटले आहे. डॉ. सिंग यांनी राजीनामा दिला असता तर अधिक चांगला पंतप्रधान मिळू शकला असता का याबद्दलही पारख यांनी शंका उपस्थित केली.

‘पंतप्रधानांच्या कमकुवतपणावर शिक्कामोर्तब’
बारू यांच्या पुस्तकाच्या मुद्दय़ावरून भाजपने पुन्हा एकदा पंतप्रधानांना लक्ष्य केले आहे. आपण फार पूर्वीपासूनच मनमोहन सिंग यांना कमकुवत पंतप्रधान म्हणून संबोधत होतो, मात्र आता बारू यांच्या पुस्तकाने त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे, असे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अहमदाबादेत बोलताना स्पष्ट केले.