निवडणुकांचा मोसम होता. मोदी विरुद्ध इतर सर्व (होय, अगदी भाजपच्या मंडळीसहित) असा छान सामना रंगला होता. फक्त एकच रुखरुख लागली होती. बातम्यांच्या थंड्या हंगामात ज्याने तमाम चॅनेले आणि छापेवाल्यांना रोजगार पुरवला, त्या आम मीडिया पक्ष, छे छे, आम आदमी पक्षाचे कोणीही नाव घेत नव्हते. दिल्लीची (धाकली) गादी केवळ जनतेच्या भल्यासाठी सोडणाऱ्या या पक्षाच्या नेत्याला आठ-आठ दिवस दूरचित्रवाणीच्या पडद्यावरून गायब केल्याने सर्वसामान्य जनतेचे भले साधण्याचा दुसरा मार्गच त्याला सापडत नव्हता.
अशात एक घटना घडली. लाली नावाच्या कोणा ऑटो रिक्षाचालकाने मिरवणुकीत येऊन अरविंद केजरीवालांना हार घातला आणि त्यानंतर सणसणीत वाजवली. एवढी सणसणीत की त्यामुळे त्यांचा चेहरा सुजला. ही थप्पड केवळ केजरीवालांवर नव्हती, ती होती तमाम कॅमेरेवाले आणि लेखणीवाल्यांना. प्रजासत्ताक भारतात क्रांती करू पाहणाऱ्या एका होतकरू युगपुरुषाकडे दुर्लक्ष करण्याची त्यांची प्राज्ञा तरी कशी झाली. साहजिकच या थपडीमुळे सर्व माध्यमीय मंडळी खडबडून जागी झाली आणि पुन्हा एकवार केजरीवाल व त्यांच्या कोंडाळ्यावर लेन्सा केंद्रित झाल्या.
वास्तविक केजरीवालांसाठी चपराक खाण्याची ही काही पहिली वेळ नव्हे. राजकारणाचे त्यांचे मनसुबे पाहून अण्णांनी खडे बोल सुनावले तेव्हा, मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर लोकांनी केलेल्या टिकेच्या वेळेस अशा लाक्षणिक थपडा त्यांना कितीतरी वेळी बसल्या. मात्र, त्याही पलीकडे प्रत्यक्ष थपडा किती खाव्या लागल्या, याचीही स्वतंत्र गणती करावी लागेल. असो.
आपल्या पक्षाच्या जन्मजात गुणानुसार केजरीवालांनी ही संधी साधली आणि सर्व लेन्साकडे पाहून एक हृदयद्रावक प्रश्न केला, ‘सर्व जण केवळ मलाच का मारतात?’ त्यानंतर त्यांनी राजघाटावर महात्मा गांधीजींच्या समाधीच्या साक्षीने आत्मचिंतन केले. किमान तसे सांगितले. एव्हाना त्यांच्या डोक्यात या घटनेचा इव्हेंट कसा करायचा, याचा आराखडा पक्का झाला असावा.
त्यामुळे एक-दीड दिवस केवळ ही थप्पड आणि तिच्या अवतीभोवती त्यांनी संपूर्ण दळण चालू दिले. मग जेव्हा कव्हरेजचा भर ओसरू लागला, तेव्हा त्यांनी आणखी एक चाल खेळली. यावेळी ते स्वतः लालीकडे गेले. मग लालीने त्यांची माफी मागितली. त्यांनीही तेवढ्याच उदार अंतःकरणाने माफ केले. कारण आदल्या दिवशी केजरी समर्थकांनी लालीला यथेच्छ धुतले होतेच. त्याचीही बातमी. त्याचेही कव्हरेज. दुसरा दिवसही आपण मिळवला, यावर केजरीवाल व त्यांची मंडळी खुश.
टीव्हीच्या पडद्यावर आणि वृत्तपत्रांच्या कागदावर जागा मिळविण्यासाठी याआधी जे काही करायचे होते, ते सर्व करून झाले होते. आंदोलने केली, मग सत्ता आली, परत सत्तेत असतानाही आंदोलने केली, नंतर सत्ता सोडली, मोठ्या-मोठ्या नेत्यांना निवडून त्यांच्या विरोधात उमेदवार जाहीर करून झाले, मग नरेंद्र मोदींना केंद्रित करणे झाले, त्यांच्याविरोधात काशीच्या आखाड्यात उतरायची घोषणा झाली, त्यासाठी गंगास्नान झाले अशा सर्व गोष्टी झाल्या.
माध्यमांचे एक विशेष आहे. माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी होते पण ती एकदाच. एकच माणूस जसजसा कुत्र्याला परत परत चावू लागतो, तशी ती बातमी छोटी होत जाते व नंतर तर अंतर्धानच पावते.
केजरीवालांचेही तेच झाले. त्यांच्या प्रत्येक कृत्याला जेव्हा कमी प्रसिद्धी मिळू लागली, तेव्हा त्यांना त्यात कट कारस्थान दिसू लागले. पण ‘अतिपरिचयादवज्ञा’ हे माध्यमांच्या बाबतीत खास करून खरे आहे. अशा अंधारलेल्या क्षणी जेव्हा शाईफेक व थपडा मारण्यांसारख्या प्रकाराला प्रसिद्धी मिळू लागली, तेव्हा ‘आप’च्या लोकांना प्रसिद्धीसाठीचा हा जवळचा मार्ग वाटू लागला असल्यास नवल नाही.
‘मटके फोडा, कपडे फाडा किंवा गाढवावर बसा, पण येनकेनप्रकारेण प्रसिद्ध व्हा,’ असे भर्तृहरीने म्हटले. त्याची अक्षरशः अंमलबजावणी जणू अरविंद केजरीवाल व त्यांची मंडळी करत आहेत.
कर्मा चित्रपटातील खलनायकाला थापड मारल्यावर म्हणतो, ‘इस थप्पड की गूंज गूंजती रहेगी’. त्याप्रमाणे आपच्या लोकांना वाटत असेल, ‘इस थप्पड का कव्हरेज होता रहेगा….’
– देविदास देशपांडे
devidas@didichyaduniyet.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)