04 August 2020

News Flash

BLOG : नरेंद्र मोदींवरील आरोप आणि त्याचे खंडन

जसजसे नरेंद्र मोदी २७१ च्या आकड्याच्या जवळ पोचू लागले आहेत, तसतशी त्यांच्याबद्दलची उत्सुकता वाढत जाऊ लागली असून, भारतीयच नव्हे पण परदेशी पत्रकारही त्यांच्याकडे जरा निरखून

| April 9, 2014 01:15 am

जसजसे नरेंद्र मोदी २७१ च्या आकड्याच्या जवळ पोचू लागले आहेत, तसतशी त्यांच्याबद्दलची उत्सुकता वाढत जाऊ लागली असून, भारतीयच नव्हे पण परदेशी पत्रकारही त्यांच्याकडे जरा निरखून पाहू लागले आहेत. त्यात पाकिस्तान, युरोपीय राष्ट्रे व अमेरिका अर्थातच पुढे आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्रांत येणारे बरेच लेख भारतीय पत्रकारांनी लिहिलेले असून त्यांची मते अर्थातच वाचण्यासारखी आहेत.
भारतीय लेखकांनीही अनेक लेख लिहिलेले आहेत, पण मी आज ज्या लेखकांचे लेख आपल्या नेहमीच्या वृत्तपत्रांत येत नाहीत, अशा लेखकांच्या लेखांचा आढावा या लेखात घेतला आहे. सर्वप्रथम मी “निती सेंट्रल” या वृत्तपत्रात लिहिणार्‍या तावलीन सिंग या लेखिकेच्या “Secular lies, communal truths in Incredible India” या लेखाने सुरुवात करत असून[१] शेवट शिवराज सिंग यांच्या “Ill-read critics of Modi using lies to belittle him” या लेखाने करत आहे[२].
तावलीन सिंग यांचा लेख आहे अहमदाबाद येथे १०० वर्षांपासून स्थायिक असलेल्या एका मुस्लिम कुटुंबातील जाफर सरेशवाला या व्यावसायिकाबद्दलचा. तो त्यांना एकदा विमानतळावर भेटला. तावलीनना त्याची मुलाखत घ्यावीशी वाटली व त्याच्याबरोबर कॉफी पिताना ती त्यांनी घेतली. त्याच्याबरोबर झालेल्या संवादात जाफरने तावलीनला सांगितले की तो आधी मोदींचा कट्टर विरोधक होता, पण आज तो त्यांचा खंदा समर्थक बनला आहे.
२००२ च्या दंगलीत जाफरचा कारखाना जाळण्यात आला. या घटनेमुळे त्याला अर्थातच खूप राग आला होता. तो त्यावेळी लंडनमध्ये होता व त्याने तेथे मोदींवर टीकेचे झोड उठवली. त्यांच्या आणि त्यांच्यासारख्या इतरांच्या कडक टीकेमुळे युरोपियन राष्ट्रांनी व अमेरिकेने मोदींचा व्हिसा रद्द केला, पण नंतर जाफरच्या लक्षात आले की गुजरातेत हिंदू-मुस्लिमांनी शांततेत जीवन जगावे, या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. म्हणून मोदी पुढच्या वेळी जेव्हा लंडनला आले त्यावेळी जाफरने त्यांची भेट घेतली. त्याने मोदींना सांगितले की जोपर्यंत दंगेखोरांना शिक्षा होत नाही, तोवर हिंदू-मुस्लिम समाजांत शांतता नांदूच शकणार नाहीं. मोदी त्याला म्हणाले की न्याय नक्की केला जाईल कारण ते स्वत: या दंगलींकडे त्यांच्या कारकीर्दीवर पडलेला एक मोठा डाग समजत होते व तो डाग ते धुवून काढू इच्छित होते.
मोदी मुख्यमंत्री होण्यापूर्वीही गुजरातेत खूप दंगली व्हायच्या. २००२ च्या दंगलींनंतर होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी एक आठवडा आधी झालेल्या एका चर्चेत[३] भाग घेत होते भाजपाचे अहमदाबादहून लोकसभेवर निवडून आलेले हरिन पाठक, काँग्रेसचे शंकरसिंह वाघेला[४] व या दंगलीची प्रत्यक्ष झळ लागलेले एक बळी बंदूकवाला. या चर्चेत भाग घेताना हरिन पाठक यांनी १९६९च्या ‘The Hindustan Times’ मधील एका लेखाच्या आधारे सांगितले कीं १९६९च्या दंगलीत बळी पडलेल्यांची अधिकृत संख्या जरी ५००० असली तरी प्रत्यक्षात १५,००० ते २५,००० लोक बळी पडले होते. यावेळी थोर गांधीवादी हितेंद्र देसाई मुख्यमंत्री होते. उलट २००२मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिन पाठक यांनी दिलेल्या आकड्यांनुसार ७९० मुसलमानांनी व २२३ हिंदूंनी प्राण गमावले होते. ८७ साली २०० दिवस जमावबंदी [५, ६] पुकारली गेली होती. प्रत्येक जमावबंदीत हाल जास्त करून मुस्लिम समाजाचेच होत असत. पण तथाकथित निधर्मी राजवटीत ५००० मुस्लिमांची हत्या झालेली १९६९ची दंगल (तुलनेने २००२च्या दंगलीत एकूण १०१३ बळी पडले होते), १९८५ ची दंगल, १९८७ ची दंगल या सार्‍या दंगलींसाठी गुजरातच्या कुठल्याच मुख्यमंत्र्यांवर अशी टीकेची झोड उठविण्यात आलेली नव्हती व म्हणून काँग्रेस पक्षाने जी टीकेची आघाडी मोदींच्याविरुद्ध उठविली आहे ती जाफरला अयोग्य, अनुचित व ओढून-ताणून आणलेली वाटली. शिवाय गेल्या १२ वर्षांत गुजरातेत एकही हिंदू-मुस्लिम दंगल झालेली नाही व एकदाही जमावबंदी पुकारावी लागलेली नाही, हीसुद्धा जमेची बाजू होतीच. जाफर म्हणाला की यापूर्वी २००२च्या दंगलीपेक्षा जास्त भीषण दंगली १९६९, १९८५ व १९८७ मध्ये झाल्या होत्या पण त्यातील किंवा १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्त्येनंतरच्या दंगलीतील कुणाही समाजकंटकांना शिक्षा झाली नव्हती. याउलट, मोदींच्या कारकीर्दीत माया कोदनानीसारख्या भूतपूर्व मंत्र्यासह ६३ जणांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे व १३ पोलीस अधिकारी तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. म्हणून गेल्या १२ वर्षांत गुजरातला लाभलेली शांतता व दंगलीत सहभागी झालेल्या गुन्हेगारांना झालेली शिक्षा पाहिल्यावर जाफर आता मोदींचा खंदा समर्थक झालेला आहे.
म्हणूनच २५ फेब्रूवारीच्या राजनाथ सिंग यांच्या “जर भाजपाचे काही चुकले असेल, तर मी मुस्लिम समाजाची माफी मागायला तयार आहे” या विधानाचा केला गेलेला विपर्यास जाफरशी झालेल्या संवादानंतर फारच जाणून-बुजून केलेला सहेतुक प्रयत्नच वाटतो. जातीय दंगलीत बळी पडलेल्या लोकांना सरकारच्या माफीपेक्षा दोषींना शिक्षा झालेली हवी असते व ती मोदींच्या राज्यात मिळालेली असल्यामुळे राजनाथ सिंगाच्या भाषणाचे तावलीनला आश्चर्य वाटले. पण नंतर या भाषणाची संपूर्ण चित्रफीत पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले की राष्ट्रीय पातळीवरील सारी प्रसारमाध्यमे चक्क खोटे बोलत आहेत.
मोदी मुस्लिमांना कुठलीही पक्षपाती वागणूक देण्याविरुद्ध असून, सार्‍या भारतीयांना एकसारखी वागणूक दिली जावी, असे मानतात व त्यानुसार त्यांच्या निवडणूक मोहिमेत ते या “सार्‍या समाजाला सारखे हक्क असावेत” या मुद्द्यावरच भर देत आहेत. राजनाथ सिंग यांनीही याच मुद्द्यावर भर दिला होता. “आजकाल काँग्रेस पक्षाचे नेते मुस्लिम जनतेच्या हलाखीच्या परिस्थितीबद्दल बोलत असतात. याला जबाबदार कोण आहे? एकूण स्वातंत्र्योत्तर ६७ वर्षांच्या काळात ५५ पेक्षा जास्त वर्षें काँग्रेसच सत्तेवर आहे[७] मग याला जबाबदार काँग्रेसच नाही का? राजनाथ सिंग यांनी मुस्लिम जनतेला आवाहन केले की त्यांनी अपप्रचाराला बळी न पडता ‘भाजपा’चे सरकार असलेल्या राज्यांत जातीय दंगली कमीत कमी झाल्या आहेत हे लक्षात घेऊन आपले आयुष्य कुठे जास्त सुरक्षित आहे हे ठरविले पाहिजे.”
हे सारे स्पष्ट केल्यावर शेवटी ते म्हणाले की भविष्यकाळात जर कधी भाजपाकडून चूक झालीच तर भाजपा त्याबद्दल माफी मागायला कचरणार नाही. थोडक्यात राजनाथ भाजपाच्या वा मोदींच्या भूतकाळात झालेल्या तथाकथित चुकांबद्दल बोलत नव्हते तर भविष्यकाळात जर चूक झाली तर त्यांची वागणूक कशी असेल याबद्दल बोलत होते. पण वृत्तपत्रांतील मजकूर वाचला तर एक वेगळाच गैरसमज होतो! हा जाणून-बुजून विपर्यास का केला जात असेल? २००२ च्या दंगलींबद्दलही अशाच सहेतुकपणे चुकीच्या बातम्या छापून मोदींना असे आसुरी छटांत का दाखविले जाते?
याला एकच कारण आहे की मोदींशिवाय इतर कुठल्याही नेत्याने काँग्रेस पक्षाच्या प्रभुत्वाला आव्हान दिलेले नाही व तेही धर्माचा किंवा जातीचा मुद्दा न मांडता. म्हणून मोदींना कसेही करून खच्ची करायचा काँग्रेसने विडा उचलला आहे व त्यासाठी ’निधर्मी’पणाचा उदो-उदो केला जात आहे
खराखुरा निधर्मीपणा आचरणावर मोदींची निष्ठा आहे. मग एखादी जाफरसारखी व्यक्ती २००२बद्दल सत्यकथन करते त्याला पुष्टी देण्याऐवजी त्याच्यावरच जातीयवादी असल्याचा आरोप केला जातो. जर कुणा वार्ताहराने मोदींचे आसुरीकरण करणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन केले तर त्यालाही जातीयवादी समजले जाते. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदींनी दंगलीनंतर केलेल्या विकासाचा गुजरातच्या मुसलमानांवर झालेला सकारात्मक परिणामांबद्दल त्यांची प्रशंसा करणारे उद्गार काढल्याबद्दल “दारुल उलूम देवबंद” या मुस्लिम धर्मपीठाच्या उपकुलगुरूपदावरून झालेली मौलाना गुलाम मोहम्मद वास्तानवी यांची हकालपट्टी.
असे कां? कारण आज हा तथाकथित निधर्मी कंपू सार्‍या राजकीय कंपूंत सर्वशक्तिमान होऊन बसला आहे! त्यात फक्त काँग्रेस व डाव्या पक्षाच्या नेत्यांचाच समावेश नाही तर बुद्धीजीवी उच्चभ्रूंचा, प्राध्यापकांचा व चित्रवाणीच्या संचालकांचाही समावेश आहे आणि ही सर्व उच्चभ्रू मंडळी निधर्मीपणाचे रक्षण करण्याच्या नावाने असत्यवदन करायला, खोट्या गोष्टी रचायला इतकेच नाही तर या सैतानांच्या मांडीला मांडी लावून सहभोजन करायलाही तयार असतात! हे जरी नेहमीचेच असले तरी निवडणुकींचा हंगाम आला की या कंपूचा चेहरा अधिकच भीषण होतो. २०१४ ची निवडणूक कमालीची अटीतटीची होऊ लागली आहे कारण भारतीय लोकशाहीच्या इतिहासात प्रथमच एक भाजपा नेता राममंदिर, बाबरी मशीद, हिंदू, मुसलमान या विषयांना हात न घालता पंतप्रधानपदावर आरुढ होऊ पाहात आहे! या उलट आज प्रथमच तथाकथित निधर्मी पक्ष जातीयवादाचा आधार घेऊन निवडणूक जिंकू पहात आहेत! हे पाहिल्यावर “उद्धवा, अजब तुझे सरकार” हे ‘जगाच्या पाठीवर’मधील गाणे आठवते.
अनाडी नेते मोदींवर चुकीचे आरोप कसे करतात? [२]
काँग्रेस व त्यांचे नेते मोदींना अनाडी म्हणून हिणवतात, पण खरे तर तेच अनाडी आहेत. मोदींच्या पाटण्यातील “हुंकार” सभेनंतर त्यांच्या विधानांचा विपर्यास करून अनेक चुकीचे आरोप करण्यात आले व गदारोळ उठविण्यात आला. पण लेखक स्वत:च इतिहासात तज्ज्ञ असल्याने त्यांनी या नेत्यांचा बुरखाच फाडला व ते उगीचच मोदींना कसे हिणवत आहेत हे दाखवून दिले!
आरोप १: मोदींनी चंद्रगुप्त मौर्य यांचा समावेश गुप्ता राजघराण्यात केला!
प्रत्यक्ष मोदी काय बोलले ते इथे त्यांच्या भाषणात ऐका:
https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=N8Tb-gRD4VE)
(कु)प्रसिद्ध काँग्रेस नेते शशी थरूर यांनी मोदींनी गुप्ता आणि मौर्य राजवंशात घोळ केला, असे म्हणत मोदींची रेवडी उडवण्याचा प्रयत्न केला, पण खरे अनाडी आहेत थरूरच. कारण मोदी म्हणाले होते, “जेव्हा आपण गुप्ता साम्राज्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला चंद्रगुप्तांची आठवण होते.” पण “सुशिक्षित अनाडी” थरूरना हे माहीत नसावे की भारताच्या इतिहासात एक नाही तर तीन चंद्रगुप्त होऊन गेले, एक होते मौर्य राजघराण्यातले आणि दोन होते गुप्ता राजघराण्यातले. मोदी चंद्रगुप्त-२ बद्दल बोलत होते. हे चंद्रगुप्त आहेत समुद्रगुप्तांचे सुपुत्र व चंद्रगुप्त-१ यांचे प्रौप्त (नातू) असलेले चंद्रगुप्त विक्रमादित्य! याच चंद्रगुप्त-२ यांच्या कारकीर्दीतच गुप्ता राजवंशाची भरभराट झाली होती. आता बोला की थरूर ‘सुशिक्षित अनाडी’ कीं मोदी अशिक्षित, अनपढ?
आरोप २: मोदी म्हणाले कीं तक्षशीला बिहारमध्ये आहे. खरं?
http://www.niticentral.com/2013/11/06/ill-read-critics-of-modi-using-lies-to-belittle-him-154867.html या दुव्यावर तो भाग ऐकता येईल.
आता एका बाजूला जेव्हा राहुल गांधी तारे तोडतात की आकाराने गुजरात इंग्लंडपेक्षा मोठे आहे व भारताचा आकार अमेरिका व युरोप यांच्या संयुक्त आकाराहून मोठा आहे तेव्हा त्यांना कोणी झापत नाही, पण मोदींनी न म्हटलेली विधाने त्यांच्या तोंडी घालून त्यांची रेवडी उडवायचा प्रयत्न करतात त्याला काय म्हणावे? मोदी म्हणाले होते की भारतातील ज्ञानयुगाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला नालंदा व तक्षशीला या दोन विश्वविद्यालयांची आठवण होते. याचा काँग्रेसच्या ‘विद्वानांनी’ कसा काय अर्थ काढला की मोदींनी तक्षशीलाचा अंतर्भाव बिहारमध्ये केला? उद्याला जर कुणी म्हटले कीं इंग्लंडच्या शिक्षणक्षेत्राबद्दल बोलतो तेव्हा ऑक्सफर्ड व केंब्रिजची आठवण होते तर त्याचा अर्थ ती दोन्ही विश्वविद्यालये एकाच गावात आहेत असा कसा काढला जाईल?
आरोप क्र. ३: मोदींनी सिकंदरला बिहारमध्ये आणले व गंगेच्या किनार्‍यावर मारले!
सर्वात प्रथम सांगायचे तर मोदींनी सिकंदरला मारलेच नव्हते. बिहारच्या दिव्य इतिहासाबद्दल बोलताना त्यांनी सुचवले होते की बिहार त्याकाळी इतका शक्तिमान होता की बिहारच्या राज्यकर्त्यांना विश्वविजेत्या सिकंदरला थोपवता आले असते. या संदर्भात त्यांनी एका कवीची एक कविता म्हणून दाखविली. या कवितेत सिकंदर गंगेत बुडून मृत्यू पावला असा उल्लेख आहे. (ही कविता मोदींनी लिहिलेली नाही.) शिवाय हा उल्लेखही सांकेतिक होता कारण नंद राजवंशाच्या राज्याची राजधानी पाटलीपुत्र गंगेच्या किनार्‍यावर होती (पाटणा एका किनार्‍यावर आहे तर पाटलीपुत्र दुसर्‍या) व या राजवंशाने सिकंदरला इतके घाबरवून टाकले होते की तो बिहारकडे आलाच नाही.
पोरसला हरविल्यानंतर सिकंदर आणखी पुढे येऊ शकलाच असता. तो आला नाही कारण तो नंद घराण्याच्या ताकदीला भ्याला व परत फिरला.
मग मोदींच्या टीकाकारांना जेव्हा इतिहास लक्षात येईल तेव्हाच त्यांना कळेल की मोदी काहीही चुकीचे बोलले नाहीत!
आरोप क्र. ४: सरदार पटेल यांच्या अंत्यसंस्काराला नेहरू हजर राहिले नसल्याचा आरोप मोदींनी केला.
आता काँग्रेस नेते ऐतिहासिक नेत्यांना मोदींच्याबरोबरच्या लढ्यात कशाला ओढताहेत? सरदार पटेलाना मोदी महत्त्व देऊ लागल्यावर त्याला ‘उत्तर’ म्हणून इतकी वर्षें त्यांना पार विसरून गेलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना एकाएकी त्यांची आठवण झाली. आहे ना प्रचंड विनोद? मग त्यांनी एक जावईशोध लावला व “पटेलांच्या अंत्ययात्रेत नेहरू सामिल झाले नव्हते” असे मोदीनी म्हटल्याचे एका निवेदनाद्वारे प्रसिद्ध केले. पण ही थाप पचली नाही! कारण हा आरोप ज्या वृत्तपत्रात छापून आला होता त्याच्या संपादकांनीच तो चुकीचा असल्याचे सांगून सखेद ते वृत्त मागे घेतले.
एक अविश्वसनीय, असाधारण आरोप: ‘हुंकार’ महासभेत मोदी घामाघूम झाले होते!
जणू नितेश कुमार मोदींची सभा अगदी बारकाईनेच न्याहाळत होते! एका बाजूला त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी निर्लज्जपणे म्हणतात की सैनिक मारले गेले तर ते ठीकच आहे. जेव्हा दुपारचे जेवण जेवून बालकं मृत्यू पावतात तेव्हा नितीश अळी-मिळी, गुपचिळी करून गप्प्प बसतात. पण मोदी निराळे आहेत. ते एक सहृदय व कनवाळू मनुष्य आहेत व आपल्या भोवती होणार्‍या घटनांबद्दल ते संवेदनाशील आहेत. त्यांना हुंकार सभेत झालेल्या स्फोटांची माहिती झाली होती. पण तिथे तैनात असलेल्या ‘डीजीपी’ने जेव्हा सांगितले की आणखी स्फोट होणार आहेत ते सार्‍यांसाठी धक्कादायक होते. त्या स्फोटांविरुद्ध कारवाई करणाऐवजी हा ‘डीजीपी’च्या हुद्द्यावरचा अधिकारी सांगत होता की अजून नुकसान होणार आहे. मोदींना स्वत:च्या सुरक्षिततेची जास्त चिंता नव्हती. ते सहज ती सभा बरखास्त करून परत जाऊ शकले असते, पण त्यांनी असे केले असते तर आणखी किती तरी लोक बळी पडले असते. म्हणून स्फोट झाले तरी मोदी आले, त्यांनी भाषणही केले व समोरच्या प्रचंड जनसमुदायाला त्यांनी आवाहन केले की सभेनंतर ते शिस्तीत व शांततेकडे लक्ष देत बाहेर पडतील. याचा परिणाम म्हणून सारे लोक व्यवस्थितपणे घरोघरी गेले. आणि सहृदय लोकांना जनतेच्या काळजीने घाम फुटला तर त्यात काय नवल?
मोदींची तुलना हिटलरशी करण्याची सध्या ‘फॅशन’ आहे. आज नितीश असे म्हणतात तर दुसरे दिवशी जयराम रमेशही त्याचा पुनरुच्चार करतात आणि तिसरे दिवशी आणखी कुणी! पण उपरोधाची गोष्ट ही की प्रत्यक्षात काँग्रेस पक्षच ‘गोबेल्सनीती’चे पालन करत आहे. तेही इतक्या उत्कृष्टपणे करत आहेत की उद्या गोबेल्सच यांच्याकडे शिकवणीसाठी येईल.
संयुक्त जनता दलाचे भूतपूर्व राष्ट्रीय कार्यवाह शिवराज सिंग यांनी या सहेतुक चुकांवरचा पडदा दूर केला आहे. संयुक्त जनता दलातून बाहेर पडल्यानंतर ते असेच संयुक्त जनता दलाच्य जातीय-निधर्मी धोरणावर हल्ला करून त्यांचा ढोंगीपणा उघड करत आहेत!
संदर्भ
[१] http://www.niticentral.com/2014/02/27/secular-lies-communal-truths-in-incredible-india-193870.html
[२] http://www.niticentral.com/2013/11/06/ill-read-critics-of-modi-using-lies-to-belittle-him-154867.html
[३] ‘The Big Fight’ डिसेंबर २००२ला अहमदाबादहून NDTV-Star News मध्ये थेट प्रक्षेपित केलेला कार्यक्रम
[४] हे आधी भाजपात होते, तिथे फाटाफूट घडवून ते कांहीं काळ मुख्यमंत्रीही झाले पण शेवटी दल बदलून काँग्रेसमध्ये गेले. आज ते विरोधी पक्षाचे नेते आहेत.
[५] Curfew, १४४ कलम
[६] Gujarat riots: The true story http://www.gujaratriots.com/index.php/2008/09/gujarats-bloody-history-of-violence/
[७] बाकी काळात मोरारजी देसाई, चरणसिंग, वि.प्र. सिंग, चंद्रशेखर, देवेगौडा, गुजराल व वाजपेयी (दोन वेळा) असे बिगर-काँग्रेसी पंतप्रधान भारताला लाभले.
– लेखक-संकलक: सुधीर काळे, जकार्ता
sbkay@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2014 1:15 am

Web Title: sattarth blog about allegations on narendra modi answers
Next Stories
1 मोदींकडे सत्ता दिल्यास हुकूमशाहीची शक्यता – शरद पवार
2 पर्यटकांचे केंद्रस्थान असलेले केरळ काँग्रेसमुळे दहशतवादाचे नंदनवन- नरेंद्र मोदी
3 संक्षिप्त : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या ८५ जणांविरुद्ध पोलिसात तक्रार
Just Now!
X