गेल्या वर्षभरापासून ‘आम आदमी’ हा भलताच चर्चेतला आणि चलनी शब्दप्रयोग झाला आहे.
राजकीय नेते, सरकारी अधिकारी, आणि धनदांडग्या मंडळींनी मिळून आम आदमीची गळचेपी केली आहे असं सर्वांना कळलं आहे. ‘त्यातून त्याची मुक्तता करणे आणि त्याचबरोबर त्याच्या त्या भावी ऐतिहासिक मुक्ततेचे श्रेयही अगोदरच घेऊन ठेवणे’ हा अनेकांचा एककलमी कार्यक्रम झाला आहे.
कुणाच्या कार्यक्रमांविषयी आपल्याला काही प्रॉब्लेम असण्याचे कारण नाही पण हा आम आदमी नावाचा बहुचर्चित प्रकार जरा समजून घेणे मात्र मला गरजेचे वाटते. राजकारणी, अधिकारी, धनदांडगे हे आधीच उल्लेख केलेले दुष्ट, भ्रष्ट, क्रूर लोक भारतात मूठभरच आहेत आणि दळला, पिडला , नाडला, गांजला जाणारा जो बाकीचा सगळा समाज आहे तो ‘आम आदमी’ आहे अशी एकूण आम आदमी नावाच्या या नमुन्याची अलिखित व्याख्या झाल्यासारखी आहे. बरे हा सगळा आम आदमी प्रामाणिक आहे, सज्जन, पापभीरू, भोळा-भाबडा आहे असाही एक गृहीत, अविवाद्य उपसिद्धांत आहे. ( राजकारणी, अधिकारी, धनदांडगे हे मूठभर वाईट्ट मेले ‘हराम आदमी’ कसे काय भारतमातेच्या पोटी निपजले कुणास ठाऊक बुवा, पण तेच तेवढे त्या बिचाऱ्या ‘आम’च्या डोक्यावर राज्य करत आहेत. थैमान मांडत आहेत, नंगा नाच करत आहेत; अशाही आणखी एका उपपत्तीची भर टाकली की आम आदमी या संकल्पनेची एकूण थिअरी संपूर्ण होते.) हल्लीचा सर्वात प्रसिद्ध, सर्वात खंदा आम आदमी म्हणतो की ‘इनकी वजह से’ (म्हणजे मूठभरोंकी वजहसे ) ते ( म्हणजे आम ) ‘त्राहि त्राहि कर रहे’ आहेत. ते ‘तंग आ चुके’ आहेत असं पण म्हणतो तो..
कोण, आहेत तरी कोण बरे हे सद्गुणांचे पुतळे असलेले पण मूठभरांमुळे बिच्चारे झालेले आम आदमी? ते राहतात कुठे? खातात -पितात- करतात तरी काय?
एक लक्षात घ्यायला हवं की ते ‘आम’ आहेत म्हणजे ‘राजकारणी, अधिकारी, धनदांडगे नाहीत’ असे सगळे आहेत. म्हणजे मग ते डॉक्टर आहेत, मजूर आहेत, सेल्समन आहेत, सलूनवाले आहेत, रिक्षावाले तर अर्थातच आहेत.. तर हे सगळे सरळ साधे.. कॉलेजात जाणारे, जत्रेत खेळणी विकणारे किंवा कपड्यांचे, किराणामालाचे दुकानदार, खेळाडू, मॉडेल्स, नट-नट्या, लेखक, रस्ते झाडणारे, चाकू-सुऱ्यांना धार लावणारे, वकील, शेतात काम करणारे, शिक्षक, बँकेत नोकरी करणारे, दक्षिणा घेऊन लोकांची लग्नं लावणारे, विमा एजंट , लॉटरीची तिकिटं विकणारे, मिठाई बनवणारे इ. इ. लोक; राजकारणी-अधिकारी-धनदांडगे नसल्यामुळे एकदम आम ‘आम आदमी’ आहेत असे स्पष्ट आहे.
लोकशाही भारतात हे सगळे आम आदमी बांधव प्रामाणिक, सचोटीने व्यवहार करू इच्छिणारे, स्वार्थत्याग कधी करता येतोय यासाठी अगदी टपून बसलेले असूनही त्यांना पदोपदी छळतायत हे नतद्रष्ट राजकारणी-अधिकारी-धनदांडगे. ( या नतद्रष्ट, अभद्र, हलकटांची नावं तरी किती वेळा घ्यायची? त्यांना इथून पुढे ‘आमेतर आदमी’ म्हणूया. तेवढाच त्यांच्या नामोल्लेखाला तरी ‘आम’त्वाचा स्पर्श होऊन त्यांची थोडीतरी पापं धुतली जावोत.. ‘आमे’न.)
(आमेन म्हटल्यामुळे संपायला ही काय किरीस्तावांची प्रार्थना नाही आणि आपला देश काय इटाली नाही. त्यामुळे आत्ता कुठे नमन झालं आहे. अजून पुढे कीर्तन किंवा तमाशा बराच बाकी आहे हे अगूदरच सांगून ठेवतो आणि पुढच्या भाषणाला सुरुवात करतो. तसं हे लिखाण सुरु आहे पण शीझन निवडणुकीचा आहे त्यामुळे भाषण म्हटलं की बरं वाटतं.)
……
अबबबब … किती ते टोमणे देत बोलायचं? बास्स…
आता एकदम सत् बोलायचं.
हे असलं सत्य बोलून दाखवलेलं कुणाला आवडत नाही, कुणाला परवडत नाही. पण बोलायला हवं..
…..
सत्य हे आहे की भारतातला ‘आम आदमी’ खरं सांगायचं म्हणजे अतिशय सुमार व्यक्ती आहे.
हे मी म्हटलं तर चूक होईल पण जागतिक पातळीवर मानव विकास निर्देशांकात आपलं स्थान पाहिलं तर हे स्वीकारण्याला गत्यंतर नाही असं दिसेल. जगभरातल्या देशांमध्ये आपला नंबर लागतो १३६ वा. तळागाळाच्या दर्जाचा मानव विकास हे आपल्या देशाचं चित्र आहे असं म्हटलं की मिरच्या झोंबल्यासारखं वाटणं स्वाभाविक आहे. मग एक युक्तिवाद करण्याचा प्रयत्न होतो की ते निर्देशांक ठरवण्याचे निकषच म्हणे आपल्या देशाचा विचार करता योग्य नाहीयेत. हे म्हणजे तुम्हाला तुमच्या गल्लीतल्या नियमाप्रमाणे जगाने क्रिकेट खेळलं तरच मान्य आहे असं म्हणण्यासारखं आहे. एक टप्पा आऊट अस्से, खिडकीला बॉल लागला की चार रन्स इत्यादि इत्यादि.
स्वतःला फसव्या आत्मगौरवात बुडवून ठेवणारं एक अचाट विधान मी लहानपणापासून ऐकलं आहे. ते असं की म्हणे ‘आपली ऐहिक प्रगती भलेही कमी असेल पण आपल्या परंपरा आणि संस्कृतीमुळे आपला नैतिक-अध्यात्मिक दर्जा खरंतर पाश्चात्यांच्या तुलनेत कितीतरी वरचा आहे !!’
घंटा!
… या देशातली बहुतांश मुले परीक्षेत ‘चान्स’ मारायला पाहतात, बहुतांश डॉक्टर्स ‘cut practice’ सारख्या प्रकारात सामील असतात, बहुतांश वकील खोट्या साक्षी आणि खोटी आर्ग्युमेंट्स उभी करणं हा आपल्या कामाचा भाग मानतात, बहुतांश ग्राहक आणि व्यापारी ‘tax’ द्यायला नको म्हणून जमेल तितके व्यवहार बिनपावत्यांचे ठेवायला पाहतात, बहुतांश नेटीझन्स चोरून ‘porn sites’ पाहतात आणि समाज कसा बिघडला आहे अशा बोंबा ठोकतात… चांगल्या मालात खराब माल मिसळून न विकणारे व्यापारी, प्रामाणिकपणे स्वतःचा अभ्यास अद्ययावत ठेऊन सगळा अभ्यासक्रम मुलांना शिकवणारे शिक्षक, कामगिरी सुधारण्यासाठी ड्रग्स न घेणारे खेळाडू, मंत्रात ‘तसली’ काही पॉवर नसते हे आपल्याला आता माहितीय पण किमान मंत्रांचा अर्थतरी सांगू शकणारे भटजी-पुजारी, शेजारच्या शेतात घुसखोरी न करणारे, दुधात पाणी न मिसळणारे शेतकरी, गर्दीमध्ये गेल्यावर ‘त्रास’ झाला नाही अशा मुलीबाळी हे आपल्या समाजात शोधून सापडणे मुश्किल आहे हे आपल्याला माहीत नसते का? … हा आपल्या ‘परंपरांनी’ आपल्या समाजाला दिलेला ‘नैतिक-अध्यात्मिक’ दर्जा ?
‘सुमार’… या एकाच शब्दात अशा समाजाचं वर्णन शक्य आहे असं मला वाटतं
सुमारांची गरज काहीही असो त्यांची निवड सुमारच असणार हे लॉजिकल आहे नं ?
एक विधान मी गेली तीस वर्षं ऐकलं आहे की ‘भारतीय मतदार गरीब असेल, अशिक्षित असेल पण तो राजकीयदृष्ट्या अत्यंत जागृत आहे. मतपेटीतून त्याने आपली ताकद वेळोवेळी दाखवून दिली आहे.’ हल्ली हल्ली या वाक्याचा अर्थ माझ्या ध्यानी येऊ लागला आहे.
……
वाचकहो, तुम्ही स्वतः विचाराने, चारित्र्याने व्यक्तिशः कसेही असाल, स्वतःला आम आदमीही समजत असाल, पण भारतातला आम आदमी बहुसंख्येनं कसा आहे हे लक्षात घ्यायला हवं. या ‘आम आदमी’चा दर्जा आणि चारित्र्य काय आहे हे लक्षात घ्यायला हवं. निवडणुकांचा निकाल हा अशा ‘बहुसंख्य आम आदमी’ची निवड असते आणि या आम आदमीनं आजवर स्वतःला साजेशा आणि रुचणाऱ्या पचणाऱ्याच प्रतिनिधींची निवड आमदार, खासदार, पंच-सरपंच, नगरसेवक म्हणून केली आहे हे लक्षात घ्यायला हवं.
एखादवेळीस तशी केली नसेल तर पस्तावून पुढच्या वेळी ती चूक दुरुस्त केली आहे हेही लक्षात घ्यायला हवं.
हे सगळं आत्ता बोलण्याचं कारण ‘आमेतर आदमी’ कसे वाईट आहेत आणि ‘आम आदमी’नं कशी त्यांच्यापासून मुक्तता करून घ्यायला हवी अशी ओरड या निवडणुकीच्या तोंडावर जरा जोरातच ऐकू येऊ लागली आहे. स्वतःला आम आदमी समजणाऱ्या बहुतेकांना हे एकदम हृदयात जाऊन पटायला-बिटायलाही लागलं आहे. गेल्या वर्षभरापासून म्हणून सुरुवातीला म्हटलं तसं ‘आम आदमी’ हा भलताच चर्चेतला आणि चलनी शब्दप्रयोग झाला आहे.
( TO BE CONTINUED..)
– विक्रम वाळिंबे
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)