आपल्या शेजारी कुणी नवीन राहायला आले तर ते कोण आहेत, शेजारी म्हणून कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांचे-आपले जमेल की नाही, असे अनेक प्रश्न आपल्या डोक्यात येतात. एखाद्या शेजार्याशी आपले पटले नाही व परिस्थिती पार असह्य झाली तर आपण घर बदलू शकतो. पण शेजारी राष्ट्रांना हा विकल्पही उपलब्ध नसतो. थोडक्यात शेजारी राष्ट्रात जर निवडणुका होणार असतील, तर नवे नेतृत्व कसे असेल, अशा प्रकारचे प्रश्न स्वाभाविकपणे आपल्या नेतृत्वाच्या व आपल्या प्रसारमाध्यमांमधून चर्चिले जाणे स्वाभाविक असते. त्यात जर शेजारी राष्ट्रांशी आपले संबंध चांगले नसतील, जुन्या वैराचा इतिहास असेल तर हे प्रश्न जास्तच महत्वाचे ठरू लागतात. पाकिस्तानशी आपले संबंध फारसे चांगले नसल्यामुळे तिथे आता आपले नवे पंतप्रधान कोण होणार, या विषयावर खूप चर्चा सुरू आहे. आजवर परिचित नेतृत्वाच्या जागी एक अपरिचित नेतृत्व येण्याची शक्यता दिसू लागल्यामुळे व या नव्या नेतृत्वाबद्दल अनेक खरे-खोटे व बरे-वाईट प्रवाद असल्यामुळे ही चर्चा एकाच वेळी गंभीर व मनोरंजकही झाली आहे.
भारताचे नवे पंतप्रधान कोण होणार, याबाबत सध्या नरेंद्र मोदी यांचे नाव आता खूपच संभवनीय वाटू लागल्यामुळे ते चर्चेत आहेत. व ते खरेच आपले पंतप्रधान झाल्यास आपले संबंध कसे राहतील, शांतता नांदेल की युद्ध पेटेल, पेटले तर परंपरागत शस्त्रास्त्रांचा वापर होईल की अण्वस्त्रेसुद्धा वापरली जातील, असे अनेक प्रश्न सध्या जोरात चर्चेत आहेत.
पाकिस्तानी प्रसारमाध्यमे मोदींकडे कुठल्या नजरेने पाहात आहेत, काय आशा बाळगून आहेत या मुद्द्यांवर तिथली प्रसारमाध्यमे काय ध्वनित करीत आहेत यावरचा हा लेख.
सन २०१३च्या पाच ऑक्टोबरला आफताब इक्बाल संचलित ‘खबरनाक'[१] या जिओ टीव्हीच्या कार्यक्रमात एक व्हिडिओ विडंबन दाखविण्यात आले होते. त्यात मोदींना कपाळावर टिळा, अंगात सफेद कुर्ता या वेषात व खेडवळ पाकिस्तानी लोकात बसून बिहारी हिंदीत ‘येडपटा’सारखी उत्तरे देताना दाखविले होते. हे विडंबनच होते, पण व्यंगचित्राचे प्रत्यक्षाशी थोडे तरी साम्य नको का? मोदी असे हिंदीभाषिक लोकांच्या ढंगात कधीच बोलत नाहीत. पण पाकिस्तानी प्रसारमाध्यमांना मोदींचे सूचक शब्दचित्रण-मग ते चुकीचे का असेना-महत्वाचे वाटते व आवडतेही. ‘मोदी भारताचे खरंच पंतप्रधान झाले तर कसे?’ या प्रश्नाने त्यांना सध्या जणू पार झपाटून टाकले आहे. ते धास्तावलेलेही आहेत व ही भीती त्यांच्या वार्तांकनांत दिसते![२] त्यांच्या विधानांवर व भाषणांवर वृत्तपत्रांचे व चित्रवाहिन्यांचे बारीक लक्ष असते. ‘अमन की आशा’ या मोहिमेशी संलग्न एका अग्रगण्य पाकिस्तानी वार्ताहर बीना सरवार यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणतात, ‘भारतीय जनतेला जितकी लश्कर-ए-तोयबाच्या हाफीज सईदबद्दल चिंता वाटते तितकीच पाकिस्तानी जनतेला मोदींची व ते भारताचे पंतप्रधान होतील याबद्दल भीती वाटते.’
मोदी भारताचे पंतप्रधान होण्याची शक्यता खूपच जास्त असल्याने त्याची खूप चर्चा होत आहे. पण ते पंतप्रधान झाल्यास पाकविरुद्ध युद्ध पुकारतील? नक्कीच तशी शक्यता कमीच आहे. तरी पाकिस्तानात मोदींबद्दल फक्त अतिशयोक्तीयुक्त लिखाण लिहिले जात आहे याचे आश्चर्य वाटायला नको!
जावेद नक्वी हे ‘डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्राचे दिल्लीतील वार्ताहर आहेत. त्यांचे बरेच लेख कित्येक वर्षांपासून मी वाचत आलेलो आहे. त्यांना साधारणपणे भारतात काहीच चांगले दिसत नाही व नेहमी खवट टोमणे मारण्यातच ते गुंतलेले असतात. मी त्यांना याबद्दल खूप वेळा लिहिलेही आहे पण ते कधीच स्पष्टीकरण करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. मोदी भारताचे पंतप्रधान होण्यावर त्यांनी ‘मोदी: पाकिस्तानी लष्कराचे उमेदवार’ या लेखात लिहिले होते की मोदी पंतप्रधान झाल्यास पाकिस्तानी लष्कर खुष होईल. ते लिहितात की मोदींचे मध्यमवर्गीय प्रशंसक फक्त मुस्लिमांबद्दल तिरस्कार बाळगत नाहीत, तर त्यांना इतरांबद्दलही तिरस्कार आहे. गुजरातमधील २००२च्या मुस्लिमविरोधी प्रयोगात दलित व आदिवासी जनतेला हिंदुत्वाची तलवार म्हणून वापरण्यात आले होते, असा जावईशोधही त्यांनी लावला आहे! ते पुढे लिहितात की पाकिस्तानच्या मुलकी आणि लष्करी सत्ताधार्यांनी पाकिस्तानला एक ‘मुस्लिम’ राष्ट्र बनविले. भडक भाषणे देणारे मोदी भारतीय लष्कराला आवडतात व ते पंतप्रधान झाल्यास नेहरूंचे आताच बारगळत चाललेले धोरण जमीनदोस्त होऊन जाईल![३] आणि पाश्चात्य राष्ट्रे पूर्वी जशी पाकिस्तानचे टाळ्या पिटून कौतुक करायची तशीच ती आता भारताचे करतील.
आणखी एक पाकिस्तानी स्तंभलेखक बशरत हुसेन किझिल्बाश ‘पाकिस्तान टुडे’ मध्ये नेहमी लिहितात. भारतीय केंद्रीय राजकारणात मोदींचे वाढते महत्त्व हे पाकिस्तानच्या व भारतातील मुसलमानंच्या दृष्टीने अशुभ का आहे, ‘मोदी रा. स्व. संघाचे प्रचारक होते. त्यांनी गुजरातवर ज्या पद्धतीने राज्य केले त्याच पद्धतीने ते संपूर्ण भारतावर राज्य करू शकतील? भारतभर होणार्या जातीय दंगलींचे विश्लेषण केल्यास असे आढळून येईल की निवडणुकीनंतरच्या किंवा निवडणुकीपूर्वीच्या सहा महिन्यांत या दंगली घडतात. येत्या निवडणुकीच्या संदर्भात या जातीय दंगली व भाजपा सरकार यांच्यातील परस्परसंबंधाकडे पाहाणे रोचक ठरेल. या निवडणुका मोदींचे भवितव्य कुठल्या दिशेने नेतील इकडे केवळ भारतीय मुस्लिमच नव्हे, तर पाकिस्तानसुद्धा सचिंतपणे लक्ष ठेवेल, यात शंका नाहीं कारण भाजपाची हिदुत्वावर आधारलेली विचारप्रणाली मुसलमानांना हिंदूंना धोका असे मानते वर मुसलमानांना अमानुष, निर्दय व गुन्हेगारही मानते.’
मोदींबद्दल टीका करताना भारतीय मुसलमान पत्रकारसुद्धा कुठेही स्वत:ला आवरत नाहींत. मोदींचे टीकाकार म्हणून परिचित असलेले अजाज अश्रफ, ए. जी. नूरानी व आकार (अहमद) पटेल हे स्तंभलेखक आपले विचार पाकिस्तानी वृत्तपत्रांत नियमितपणे लिहीत असतात. मुस्लिम राष्ट्रांत मोदींच्या पंतप्रधान बनण्याबद्दलच्या धाकधुकीबद्दल अजाज अश्रफ पाकिस्तानी ‘डेली टाईम्स’ मध्ये लिहितात की लोकशाहीत पुरेसे बहुमत असणे ही मूलभूत गरज आहे व ती मोदींनासुद्धा आहे. आधी गुजरातच्या गौरवाबद्दल बोलणारे मोदी आता भारताच्या गौरवाबद्दल बोलून आपल्या भावनाप्रधान शैलीत ते भारताच्या असुरक्षिततेच्या भावनांना ‘हवा’ देऊन काल्पनिक शत्रू तयार करू शकतील. असे शत्रू भारताबाहेर-खास करून दक्षिण आशिया खंडांत[४]-सहजपणे सापडतील. एखाद्या देशाविरुद्धचा व्यापारविषयक वाद, एखाद्या देशाला आधी दिलेली पण अचानक मागे घेतलेली सवलत किंवा शेजारी राष्ट्रांबरोबर झालेली सीमेवरील चकमक अशा घटनासुद्धा एखाद्या अपरिहार्य संघर्षाची नांदी ठरू शकतात. दुर्बल लोकांचा उपयोग करून घेत स्वत:ला बलवान करून घेणे, हा तर मोदींच्या शैलीचा गुणविशेषच आहे! शेवटी सर्वात बलवानच ‘दादा’ बनतो!’
मोदींच्या उन्नतीच्या कारणांचे विश्लेषण करताना राजकीय विषयांवर लिहिणारे व पाकिस्तानातील लोकप्रिय भारतीय पत्रकार सईद नकवी ‘फ्रायडे टाईम्स’मध्ये लिहितात, ‘भाजपाला एक भीती आहे की मोदी आणि त्यांचे साथीदार आज ना उद्या गुजरातमध्ये चाललेल्या चौकशीसत्रात जर दोषी ठरले व जर त्यांच्याबरोबर भाजपासुद्धा बदनाम झाली तर पुढे काय? पण मोदींना जर हिंदुत्वाच्या मंचाचा उपयोग करून उच्चपदावर नियुक्त केले तर ते बेगडी निधर्मीशक्तींच्या कारस्थानाला बळी पडले असा प्रचार करून उत्तर देता येईल. आज निधर्मी शक्ती आधीच अशक्त झाल्या आहेत व एका पार खिळखिळ्या झालेल्या संसदीय चौथर्यावर डळमळत उभ्या आहेत. त्यांच्यापुढे केशरी पोषाखातले, राष्ट्रप्रमुखाच्या ऐटीत सादर केले गेलेले मोदी एक जोरदार शक्ती ठरू शकतील असे सांगत मोदींना भाजपाच्या श्रेष्ठींवर लादण्यात त्यांचे समर्थक यशस्वी झाले आहेत!’
केवळ वृत्तपत्रेच मोदींवर भाष्य करतात असे नाही. पाकिस्तानी चित्रवाणीवरही मोदींवरील चर्चेला भारतीय चित्रवाणीइतकेच उधाण आलेले आहे. ज्या दिवशी पाकिस्तानात ४३ नागरिकांना मारणारा दहशतवादी हल्ला झाला त्या दिवशीसुद्धा त्या हल्ल्याची चर्चा करण्याऐवजी पाकिस्तानी पंतप्रधानांनी आपल्या पंतप्रधानांना ‘देहाती औरत’ म्हटल्याच्या मोदींच्या टीकायुक्त भाषणाचाच उहापोह चालला होता!
मोदी पंतप्रधानपदाचे भाजपचे उमेदवार म्हणून झाल्यानंतरच्या त्यांच्या पहिल्या-वहिल्या भाषणावर अर्ध्या तासाची मोठी चर्चा ‘एआरवाय न्यूज’ या पाकिस्तानी वाहिनीवर झाली. (याच भाषणात मोदींनी पाकिस्तानला “भारताशी लढण्याऐवजी गरीबीशी लढा” हा सल्ला दिला होता.) या चर्चेत या वाहिनीने प्रत्येक राज्यातील मोदींच्या लोकप्रियतेचे मूल्यांकन केले होते. या चर्चेचे संचालक आमीर घौरी यांनी मोदी ही व्यक्ती पाकिस्तानी प्रसारमाध्यमांना इतकी महत्वाची का वाटते, हे विशद केले. त्यांना एका बाजूला मोदींची पाकिस्तानविरोधी जहाल निवेदने महत्वाची आहेत, तर दुसर्या बाजूला सध्या सत्तेवर नसलेल्या पण सत्ताधार्यांवर अंकुश ठेवणार्या पाकिस्तानी जहालमतवादी नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया व त्यांची रस्त्यावर उतरण्याची तयारी याही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत, असे घौरींना वाटते.
याच कार्यक्रमात एक माननीय स्तंभलेखक ओरिया मकबूल जान यांनी खालील मुद्दे मांडले. ते म्हणाले की बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्यासारखे मूलतत्ववादी घटक जिथे राजकीय पक्षांना समर्थन देतात, असा भारत हा एकमेव देश आहे. असे पक्ष निवडणुका जिंकून १२ वर्षे राज्य करतात[५]. पण पाकिस्तानात असले मूलतत्ववादी घटक एकवेळ ब्लॅकमेल करू शकतील पण निवडणुका जिंकू शकत नाहीत. भाजपा पक्ष (आणि वाजपेयीसुद्धा) अशा मूलतत्ववादी घटकांचाच प्रतिनिधी आहे. कॉंग्रेसच्या गठ्ठा मतदान नीतीच्या संदर्भात ‘९० टक्के भारतीय जनता दलित आहे’ व ‘हाफिज सईद यांच्या व मोदींच्या भाषणात साम्य आहे’ अशी विक्षिप्त विधाने करून वस्तुस्थितीच्या विपर्यास चालूच रहातो.
आपल्या ‘ज्ञाना’ची चुणूक दाखविताना घौरी पुढे म्हणाले, ‘नरेंद्र मोदींशी तूलना करता राहुल गांधींनी आपली एक ‘आंतरराष्ट्रीय व्यक्ती’ अशी प्रतिमा घडविलेली आहे कारण त्यांनी हावर्डमध्ये शिकून तयार झालेल्यांचा संघ बनवून ट्विटर व आंतरजालावरील इतर सामाजिक वर्तुळांमध्ये हिरोसदृश स्थान बनविले आहे.’
आता घौरींना राहुल गांधींची प्रशंसा करायची आहे की उद्धट टोमणा मारत हेटाळणी करायची आहे हे न कळे!
भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंधांबद्दल अशी कर्णकर्कश आवाजातील चर्चासत्रे व युद्धाला खतपाणी घालण्याचे प्रकार भारतीय वाहिन्यांवर तर चालूच असतात. भारतातील कित्येक वाहिन्या घुसखोरी, दहशतवाद व काश्मीर या विषयांवरून स्वत:चे रूपांतर जणूं युद्धाच्या छावण्यात करतात. पण पाकिस्तानी प्रसारमाध्यमांत या विषयांना दुय्यम महत्व दिले जाते. पण भारतातील राजकारण व मोदींची २०१४च्या विजयासाठीची प्रचारमोहीम या विषयांवर त्यांची नजर खिळलेली आहे. थोडक्यात मोदींच्याबद्दल जितकी आस्था भारतीय वाहिन्यांना आहे तितकीच पाकिस्तानी वाहिन्यांनाही आहे.
आता आकार अहमद पटेल यांच्या दोन लेखांकडे (‘मोदींच्या बाबतीत माझं चुकलंच!’ आणि ‘संभ्रमित नरेंद्र मोदी’) यांच्याकडे वळतो. पाकिस्तानात प्रकाशित होणार्या ‘एक्स्प्रेस ट्रिब्यून’ या वृत्तपत्रात प्रकाशित होणारे त्यांचे लेख मी नियमितपणे वाचतो. बहुतांशी भारताचे फारसे कौतुक न करणारे व काहीसे नकारात्मक लेख वाचून बर्याचदा मी त्यांच्या लेखांवर टीकाही करतो. आधी नरेंद्र मोदींवर सतत टीका करणारे पटेल अलीकडे मोदींची काहीशी प्रशंसा करणारे लेख लिहू लागले आहेत, असे मला जाणविले आहे.
‘मोदींच्या बाबतीत माझं चुकलंच!’ या १४ सप्टेंबर २०१३ रोजी लिहिलेल्या लेखात ते लिहितात, ‘गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी स्वत: पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून कधीही पुढे येणार नाहीत असे जे काही महिन्यांपूर्वी त्यांनी लिहिलं होतं ते चुकलंच. भाजपाच्या सामान्य कार्यकर्त्यांचा पाठिंबा त्यांना आधीपासूनच होता. नंतर जेव्हा भाजपाने त्यांची नेमणूक ‘निवडणुकीच्या मोहिमेचे अध्वर्यू’ म्हणून केली तेव्हा त्यांच्या प्रयत्नाने भाजपाला जर बहुमत मिळाले तर त्यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड ओघानेच झाली असती. कारण मोदींसारखा अखिल भारतीय पातळीवर लोकप्रियता लाभलेला-खास करून मध्यमवर्गीयांत-दुसरा कुणीच नजरेसमोर नव्हता.’
ते पुढे लिहितात, ‘या परिस्थितीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यास त्यांना भाजपाच्या यशाचा संपूर्ण भार आपल्या खांद्यांवर उचलावा लागला असता. भाजपावर त्यांची तशी संपूर्ण पकडही नव्हती हे सदैव एवढ्या-तेवढ्यावरून रुसणार्या अडवानींच्या वागणुकीवरून स्पष्ट दिसत होते. त्याऐवजी निकाल लागेपर्यंत वाट पहात रहाणे व निकाल लागल्यानंतर मान झुकवून जयमालेचा स्वीकार करणे जास्त श्रेयस्कर होते! पण मोदी भलतेच धीट निघाले. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून केलेल्या स्वत:च्या कामगिरीवरून त्यांनी देशाला स्वत: पंतप्रधान म्हणून अर्पण केले….! यासाठी त्यांचे कौतुक करावे तितके कमीच! आता त्यांना पूर्वी ‘NDA’त असलेल्या पण मोदींना घाबरून बाहेर पडलेल्या नेत्यांना तसेच मोदींच्या बढतीमुळे रुसल्या-फुगलेल्या स्वत:च्याच पक्षातील अडवानी, सुषमा स्वराज व शिवराज चौहान यांच्यासारख्या नेत्यांनाही दादापुता करून शांत करणे असली कामे त्यांना करावी लागतील.’
ते पुढे म्हणतात, ‘सध्या मोदींवर तीन महत्वाच्या जबाबदार्या आहेत. गुजरातचे मुंख्यमंत्रीपद, भाजपाच्या निवडणूक मोहिमेचे अध्वर्यूपद आणि भाजपासह सार्या एनडीएचे सर्वेसर्वा असल्याची जबाबदारी! आधी तिसरी जबाबदारी अडवानींच्याकडे होती पण आता तीही मोदींच्यावर येऊन पडलेली आहे. भाजपाचा ‘एका नेत्याला एकच जबाबदारी’ हा नियमही आता मोडला गेला आहे. आणि मोदींच्या पदोन्नतीमुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.’
‘आता काँग्रेसला मोदींच्या नेतृत्वाखालील खडतर व अडचणी निर्माण करणार्या मोहिमेला तोंड द्यावे लागणार आहे. मतदारांना संदेश देण्याबाबतीत आणि मतदारांत चैतन्य आणण्याच्याबाबतीत मोदींनी योजलेल्या व आजवर न दिसलेल्या अनेक नव्या गोष्टी भारतीय मतदारांना पाहायला मिळतील. मेमध्ये होणार्या निवडणुकींची तयारी करायला आता मोदींच्याकडे वेळ आहे. आता ते राष्ट्रीय पातळीवर साधनसामुग्रीची व्यूहरचना कशी करतात हे लवकरच दिसेलच.’
‘मोदींचे खास वैशिष्ट्य आहे एखादी योजना वेगाने कार्यान्वित करणे व तिची चोख अमलबजावणी करणे. पंचवीस वर्षांपूर्वीची रथयात्रा व गुजरातमध्ये जिंकलेल्या तीन निवडणुका ही उदाहरणे खूप बोलकी आहेत. सर्वात महत्वाचे काम आहे पक्षातील बंडखोरांना परत आणणे व भाजपच्या मतांना विभागणीपासून रोखणे. मोदींसारख्या व्यक्तिमत्वावर जरी निवडणूक लढविली जात असली तरी जातिभेदांवर आधारलेल्या भारतीय निवडणुकांत स्थानिक मुद्दे, भाषेचे मुद्दे व सामाजिक मुद्दे येणे अपरिहार्य आहे व हे भारतात सांप्रदायिकता व विकास या मुद्द्यांपेक्षा महत्वाचे मानले जातात.’
त्यांच्या दुसर्या ‘संभ्रमित नरेंद्र मोदी’ या अलीकडे ९ मार्च २०१४ रोजी प्रकाशित झालेल्या लेखात ते म्हणतात की एरवी भरपूर बोलणारे मोदी स्वत:च्या मतांबद्दल उघडपणे फारच मितभाषी आहेत. साधारणपणे ते मुलाखत देतच नाहीत, दिलीच तर त्यांना ज्या विषयांवर मतप्रदर्शन करायचे नसते त्या प्रश्नांवर ते आपले तोंड बंदच ठेवतात. म्हणूनच “नयी दुनिया” या उर्दू वृत्तपत्राच्या संपादकाला त्यांनी दिलेली मुलाखत महत्वाची आहे.
पटेल लिहितात, ‘शाहीद सिद्दीकी या समाजवादी पक्षाच्या खासदाराशी मोदी दीड-एक तास बोलले. त्यात त्यांचे ‘मी जर गुजरातमधल्या २००२सालच्या दंगलींबद्दल दोषी असल्याचे सिद्ध झाले तर मला खुशाल फाशी द्या’ हे विधान सनसनाटी ठरले. पण त्यामुळे काही इतर महत्त्वाचे मुद्दे दुर्लक्षित राहिले. मूळ उर्दू मुलाखतीचा संपूर्ण मजकूर त्या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तो वाचल्यानंतर खालील मुद्दे इथे मांडावेसे वाटतात.’
ते पुढे म्हणतात, ‘सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मोदींचे भारतीय मुसलमानांबरोबरचे काहीसे अवघड संबंध. सिद्दीकींनी विचारलेल्या ‘तुम्ही अद्यापही अखंड भारताच्या[७] निर्मितीबद्दल आशावादी आहात काय?’ या प्रश्नाला उत्तर देताना पलटवार करत मोदी म्हणाले, ‘साम्राज्याची स्वप्नें पाहाणारेच अखंड भारताची चळवळ करत आहेत. पाकिस्तानात पाकिस्तान, भारत व बांगलादेश यांना एक करून तिथे मुसलमानांचे बहुमत असलेला ‘अखंड भारत’ पाकिस्तानी लोकांना हवा आहे. मुसलमान बहुमत असलेला देश बनवायच्या आशेने त्यांच्या तोंडाला अलीकडे पाणी सुटत आहे, कारण अखंड भारताच्या नावाखाली सर्व मुसलमानांची एकी करून व भारतीय मुसलमानांना आघाडीवर ठेवून तणाव निर्माण करायचा आहे. तुम्हीसुद्धा हेच स्वप्न पाहात असाल!’ ही भाषा भावी पंतप्रधानाच्या तोंडात शोभत नाही, असे पटेल यांना वाटते.
मोदींनी मांडलेला दुसरा मुद्दा होता कारस्थानांबद्दलचा. त्यांनी सिद्दीकींना सांगितले की सार्या प्रसारमाध्यमांनी जणू त्यांच्याविरुद्ध खोटानाटा प्रचार करण्याचे कंत्राटच घेतले आहे. आता प्रसारमाध्यमातील काही लोक सातत्याने मोदींविरुद्ध लिहीत असतील, त्यातले काही मोदीविरोधकांचे भाडोत्री ‘पित्ते’सुद्धा असतील पण सगळेच्या सगळे नक्कीच तसे नाहीत. या परिस्थितीत त्यांच्याविरुद्ध षडयंत्र रचले जात आहे, असा थोडाच अर्थ होतो? मोदींचा प्रसारमाध्यमांबद्दलचा हा ग्रह विचित्र, धक्कादायक व अस्वस्थ करणारा आहे!
तिसर्या मुद्द्यात पटेलना मोदींचा भंपकपणाच दिसतो! ते म्हणाले मी केलेल्या कामातून मीच इतके उंच मानदंड निर्मिले आहेत की मी स्वत:च स्वत:ला एक आव्हान बनलो आहे. मी रोज १६ तास काम करतो तर लोकांना वाटते की मी १८ तास का नाही काम करत? लोकांच्या माझ्याबद्दलच्या अपेक्षाच खूप उंचावलेल्या आहेत. अशा स्वत:बद्दल राणा भीमदेवी छाप घोषणा करणारा नेता एकाद्या देशाचा पंतप्रधान बनू घातलेला नेता आहे यावर कोण विश्वास ठेवेल? ‘दोषी सिद्ध झालो तर मला फाशी द्या’ या विधानामुळे त्यांच्या मुलाखतीतील इतर महत्वपूर्ण मुद्दे दुर्लक्षिले गेले ही दुर्दैवाचीच गोष्ट आहे!
ही मुलाखत मोदींना अनुकूल होती म्हणून समाजवादी पक्षाने सिद्दीकींना पक्षातून बाहेर काढले. हीसुद्धा दुर्दैवाची गोष्टच!
टिपा:
[१] ‘खतरनाक’वरून घेतलेला ‘खबरनाक’ हा शब्द मला खूप आवडला!
[२] या एकाच कारणावरून भारतीय जनतेने मोदींना पंतप्रधानपदावर आणावे!
[३] इथे त्यांनी Nehruvian tryst अशी शब्द योजना केली आहे. बहुदा त्यांना “tryst with destny” आठवली असावी!
[४] दक्षिण आशियात (SAARC) येतात बांगलादेश, भूतान, भारत, मालद्वी, नेपाळ, पाकिस्तान व श्रीलंका
[५] हा बहुदा गुजरातमध्ये २००२-२०१४ दरम्यान चाललेल्या मोदी सरकारबद्दलचा उल्लेख आहे.
[६] याच संघटनेचे बंदीपूर्व नाव होते लश्कर-ए-तोयबा!
[७] “अखंड भारत” या फाळणी न झालेल्या भारताचा रा.स्व.संघ बर्याच वेळा उल्लेख करतो. सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत व या आधीचे सरसंघचालक सुदर्शन या विषयावर खूपदा बोलत. भागवत म्हणाले की आपले राष्ट्र अधिक बलवान बनविण्यासाठी चीन, रशिया व अमेरिकेसह सर्व देश राष्ट्रहिताच्या भावनेने विस्तारवादी प्रवृत्ती बाळगून उघड-उघड आपल्या देशाच्या सीमा विस्तारू पाहात आहेत. काश्मिरी पंडितांच्या मुद्द्याला हात घालून ते म्हणाले की फक्त भारतातच आपले नागरिक आपल्याच जन्मस्थानापासून दूर निर्वासितांचे जिणे जगत आहेत.
– लेखक-संकलक : सुधीर काळे, जकार्ता
sbkay@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)