सन २०१४ची लोकसभा निवडणूक तूळ राशीतील वक्री शनीच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. ज्या ज्या वेळी तूळ राशीत शनी येतो. त्या त्या वेळी तो भारतीय सामाजिक आणि राजकीय अभिसरणातून क्रांती घडवत असतो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या काळात रवी शनी प्रतियुतीची पार्श्वभूमी असतानाच मंगळसुद्धा वक्री होता. मंगळ हा युवा पिढीवर अंमल करत असतो. गेल्या पाच वर्षांच्या काळात भारतीय तरूण पिढी (अर्थातच नेटिझन्स) बुरसटलेल्या विशिष्ट सामाजिक आणि राजकीय विचारांतून बाहेर पडू लागली आणि आताच्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत या वैचारिक अभिसरणाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळेच यंदाच्या वक्री मंगळाच्या प्रभावातील लोकसभा निवडणूक तरुणांमुळे क्रांतिकारक ठरेल, एवढे निश्चित!
बऱयाच वेळेस जनमत चाचण्यांनी किंवा एक्झिट पोलनुसार वर्तवलेल्या अंदाजापेक्षा कमीच जागा मिळण्याचा किंवा त्याच्या उलट मतप्रवाह निकालानंतर दिसतो. परंतु, या वेळेला तिसऱया आघाडीच्या अपयशामुळे नरेंद्र मोदींच्या जागा धक्कादायकरित्या वाढूही शकतात. तूळ राशीतील वक्री शनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तिसऱया आघाडीचे अस्तित्त्वच संपवेल. यंदाच्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्येही अतिशय धक्कादायक निकाल लागून तिसऱया आघाडीला मोठा धक्का पोहोचेल, असे दिसते.
नरेंद्र मोदींची वृश्चिक रास आहे आणि वृश्चिकेत मंगळही आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या काळात मंगळ वक्री असताना त्यांनी तरुणांवर मोठी छाप पाडली आहे. यंदा मतविभागणी होऊन तिसऱया आघाडीला अतिशय कमी जागा मिळणार आहेत. त्यामुळेच पूर्वीच्या कॉंग्रेसच्या निवडणुकीसारखा भाजपला यंदा फायदा होईल. भाजपला सर्वाधिक जागा मिळून नरेंद्र मोदी स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करतील. जर अगदी काठावरची परिस्थिती उदभवलीच तर जयललिता नरेंद्र मोदींच्या पाठिशी उभ्या राहतील. कारण निकालानंतर मीन राशीतील उच्च शुक्रामुळे एखादी स्त्री नरेंद्र मोदींचे भवितव्य ठरवू शकते.
यावरील सर्व गोष्टींचा फलज्योतिषशास्त्रीय सविस्तर उहापोह आम्ही ऑक्टोबर २०१३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘भाग्यसंकेत’ दिवाळी अंकात केलाच आहे. त्यावेळी निवडणूकसुद्धा घोषित व्हायची होती. शिवाय नितीशकुमार एनडीएमधून बाहेर पडल्याने त्यावेळी नरेंद्र मोदींच्या विरोधात मोठी लाट होती व मोदींना पक्षांतर्गतही विरोध होता. अशावेळी आम्ही शास्त्राधारे मोदी लोकसभेच्या २३० जागांच्यापुढेच वाटचाल करतील, असे भाकीत केले आहे. शिवाय उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये नरेंद्र मोदी इतर पक्षांना धूळ चारतील, असेही आम्ही आमच्या कव्हर स्टोरीमध्ये म्हटले आहे. हे आम्ही आपल्या माहितीसाठी सांगत आहोत.
– श्रीराम भट, पुणे
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)