आता निवडणुकीचे शेवटचे तीन अंक राहिले आहेत. हा नऊ अंकी महाप्रयोग हळूहळू भरतवाक्याच्या दिशेने चालला आहे. विविध तज्ज्ञांचे, विश्लेषकांचे, पत्रकारांचे अंदाज वाचायला मिळत आहेत. परंतु, वेगवेगळ्या मतदारसंघात फेरफटका मारला असता, असे दिसते की, मतदानाला सरसकट एका निकषाअंतर्गत वर्गीकृत करणे धाडसाचे होईल. बऱयाच स्तरातील लोकांचे विचार जाणून घेतल्यावर असे लक्षात आले की ‘ब्लॅक अॅंड व्हाईट’ सर्वच गोष्टी आहेत असे नाही. गृहीत धरून अंदाज बांधले तर पश्चाताप होऊ शकतो. हे लिहिण्याचे कारण असे की अजूनही बरेच लोक विविध निकषांवर लोकसभेलासुद्धा मतदान करतात.
उदाहरणार्थ…
१. उमेदवार माझ्या जातीचा आहे का?
२. उमेदवार माझ्या धर्माचा आहे का?
३. उमेदवार स्वच्छ आहे का?
४. उमेदवार सुशिक्षित आहे का?
५. उमेदवाराने निवडणुकीत आर्थिक फायदा करून दिला का?
६. उमेदवाराने गणेश मंडळाला मदत केली का?
७. उमेदवार विद्यमान खासदार असेल, तर नोकरी मिळवून दिली का?
८. घरातील तोरण आणि मरण या मंगल आणि अमंगलप्रसंगी कार्यकर्त्यांची विचारपूस केली का?
९. उमेदवाराच्या पक्षाची पाच वर्षांतील कामगिरी
१०. पक्षाच्या नेत्यांची प्रतिमा
११. शहराच्या विविध समस्यांवर दिल्लीकडून योजना आणून कार्यान्वित केल्या का?
१२. व्यासपीठाशिवाय इतर कमी चमचमणाऱया ठिकाणी परिणामकारक कामे करताना तो दिसला का?
१३. दिल्लीतील सरकारचे पाच वर्षांचे ऑडिट लाभांश देणारे आहे का?
१४. विरोधी पक्षाची भूमिका आणि विश्वासार्हता
१५. नाराज नेत्यांचा विषयसुद्धा निवडणुकीचा निकाल ठरवू शकतो. नाराज नेते आणि त्यांचे कार्यकर्ते निष्क्रीय राहिले किंवा त्यांनी त्यांची ताकद दुसऱया उमेदवाराच्या मागे लावली तर निकालावर परिणाम होतो. आणि असे नाराज नेते प्रत्येक पक्षात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आहेत. नाराज कार्यकर्त्यांचा परिणाम शून्य करणारी समांतर प्रचार यंत्रणा ज्या पक्षाकडे आहे तो यशाच्या जवळ जाणार. उदा. जशी भाजपकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यंत्रणा आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा सहकार क्षेत्रातील कर्मचारी वर्ग आहे.
१६. तिरंगी, चौरंगी लढतीत होणारे मतांचे विभाजन हा निकालावर परिणाम करणारा मोठा घटक आहे.
त्यामुळे लोकसभेचा निकाल विविध मुद्द्यांवर अवलंबून आहे. तुम्हाला गंमत सांगतो. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मी आमच्या सोसायटीच्या वॉचमनला विचारले काय काका कोणाला मत दिले? ६० वर्षांचे वॉचमन काका म्हणाले, एका पक्षाची प्रचारफेरी आपल्या दारावरून गेली. त्यांचा उमेदवार जीपवर उभा होता मी त्याला हात केला. त्यानेपण मला केला. मी खूष झालो. म्हंटल चला यालाच मत देऊन टाकू.
वरील सर्व मुद्दे गौण ठरवून जर मतदारांनी एकाच पक्षास भरभरून मतदान केले तर त्या पक्षाची ती लाट म्हणावी लागेल. १६ मेला आपल्या लक्षात येईल की जनता लाटेवर स्वार झाली का नाही. तोपर्यंत अंदाज बांधणे धोकादायक…
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)