करुणानिधी, रामविलास पासवान, शरद पवार आणि फारुख अब्दुल्ला इ. मंडळी ज्या प्रकारे सत्तेच्या दिशेला तोंड करून उभे राहतात, त्यावरून त्यांना आता राजकीय वातकुक्कुट म्हणून मान्यता मिळायला हरकत नसावी. द्राविड मुन्नेत्र कळगम पक्षाचे नेते एम. करुणानिधी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे त्यांचे चांगले मित्र असल्याचे जे विधान केले आहे, ते याचेच उदाहरण म्हणायला पाहिजे.
तमिळनाडूतील राजकीय परिस्थितीच अशी बनली, की गेली दहा वर्षे भारतीय जनता पक्षाचा वाराही सहन न होणाऱ्या करुणानिधी यांना ही कोलांटउडी घ्यावी लागली आहे. शिवाय येत्या निवडणुकीच्या निकालाचा अंदाजही त्यातून मिळाला आहे.
करुणानिधी यांच्या हाडवैरी आणि अण्णा द्रामुकच्या नेत्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आधीच पंतप्रधानपदावर दावा ठोकून राज्यातील मतदारांना भावनिक आवाहन केले आहे. राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याच्या निर्णयाने त्यांनी बऱ्यापैकी जनमतही बाजूला करून घेतले आहे. हा निर्णय योग्य का अयोग्य हा मुद्दा अलाहिदा, मात्र त्यांनी करुणानिधींवर याबाबतीत कडी केली, यात शंका नाही.
खरं तर अम्मा आणि नरेंद्र मोदी यांच्यातील सौहार्द अधिक जगजाहीर. मात्र अम्मांनी भारतीय साम्यवादी पक्षाशी युतीची घोषणा केली. त्यात दोन हेतू होते. एक म्हणजे, स्वतःच्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षांना कुरवाळणे शक्य व्हावे आणि दुसरे म्हणजे करुणानिधींना मिळणारी साम्यवादी पक्षाची रसद रोखावी. कम्युनिस्ट आणि करुणानिधींचा गेल्या एक दशकांपेक्षा अधिक दोस्ताना. स्वतःच्या मुलांमध्ये द्रामुक पक्षाची शकले उडालेले असताना करुणानिधींना साम्यवाद्यांच्या बळावर ही निवडणूक निभावणे शक्य झाले असते. त्यात अम्मांनी खोडा घातला.
इकडे घरातील भाऊबंदकीने मेटाकुटीला आलेल्या करुणानिधी यांना राजकीय डाव खेळण्याचीही संधी मिळत नव्हती. ते स्वतः नव्वदीच्या घरात आणि अळगिरी आणि स्टॅलिन या दोन मुलांमधील भांडणात पक्षाची दोन शकले झालेली. अभिनेता विजयकांत यांच्या देसिय मुरपोक्कु द्राविड कळगम पक्षाशी युती केली असली, तरी द्रामुकची अवस्था पाहून त्यांचाही आवाज चढलेला अन् शिवाय या पक्षालाही सोबत घेण्यासाठी काँग्रेस व भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असलेली, या अवस्थेत एवढी मोठी राजकीय लढाई लढणे त्यांना शक्य नव्हते.
अशा परिस्थितीत मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार केंद्रात आलेच, तर अम्मांच्या ऐवजी आपला रूमाल आधीच टाकून ठेवावा, हा कलैञर (कलातज्ज्ञ) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या नेत्याचा हिशेब असावा. तमिळनाडूतील दोन्ही प्रमुख द्राविड पक्षांना विचारसरणी वगैरेंची काहीही पथ्ये नाहीत आणि सत्तेसाठी राष्ट्रीय पक्षांनाही त्याचे सोयरसुतक नाही. राजीव गांधींच्या कटामध्ये ठपका ठेवलेला द्रामुक पक्ष काँग्रेसला चालतो आणि शंकराचार्यांना अटक करणाऱ्या जयललिताही भाजपला शत्रू वाटत नाहीत. शिवाय भाजपसोबत आधीही द्रामुक पाच वर्षे नांदलेला. त्यामुळे पुन्हा सोयरिक करणे फारसे अवघड नाही.
मोदी यांनी पंतप्रधानपदासाठी मैदानात उडी घेतल्यापासून त्यांच्या राजकीय बळाचा जो ताळेबंद मांडण्यात येत होता, त्यात दक्षिण भारत ही सर्वाधिक कमजोर बाब असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र कर्नाटकात येडियुरप्पा यांना अगोदरच भाजपने पावन करून घेतले आहे, आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी आणि तेलुगु देसम हे दोन्ही पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्यास तयार आहेत. केरळमधील जागा सत्ता संपादनाच्या दृष्टीने फारशा महत्त्वाच्या नाहीतच. उरला तमिळनाडू, तेथेही दक्षिणेचे ऊन पश्चिमेकडे सरकून पाठिंब्याची सावली मोदींच्या बाजूने झुकू लागल्याची ही चिन्हे आहेत.
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)
– देविदास देशपांडे