पुण्यात नुकत्याच झालेल्या आणि मतदारांची नावे गायब होण्याच्या प्रकारामुळे गाजलेल्या लोकसभा निवडणुकीचा किस्सा. काँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या अन्य उमेदवारांसोबत २६ मार्च रोजी अर्ज भरणार असे आधी जाहीर करण्यात आले होते. मात्र, डॉ. कदम यांनी गुपचूप जाऊन २५ मार्च रोजीच आपला अर्ज भरला आणि विशेष म्हणजे त्यांचे दोन्ही प्रतिस्पर्धी, भारतीय जनता पक्षाचे अनिल शिरोळे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दीपक पायगुडे यांनीही त्याच दिवशी अर्ज भरला. डॉ. कदम यांच्या या कृतीची कल्पना त्यांच्या स्वपक्षीयांनाही नव्हती, ही आणखी गंमत. याबद्दल पत्रकारांनी शोध घेतला, तेव्हा मुहूर्त साधण्यासाठी असे केल्याचे दबक्या आवाजात सांगण्यात आले. म्हणजेच तो दिवस, ती वेळ शुभ होती असे तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना सांगण्यात आले होते आणि म्हणून तिघांनीही त्याच दिवशी आपला अर्ज भरला. सुदैवाने किंवा दुर्दैवाने (?), या तिघांपैकी एकच जण निवडून येणार आहे आणि बाकी दोघांचा मुहूर्त हुकणार आहे.
आता एक महिना पुढे जाऊ. ३० एप्रिल रोजी गुजरातेतील संपूर्ण २६ जागांसाठी मतदान होणार असते. वडोदरा येथून भाजपच्या होतकरू पंतप्रधानपदाच्या नवमान्यताप्राप्त पत्नी जशोदाबेन मोदी मतदान करणार असतात. त्यांना १२ वाजून ३९ मिनिटांनी मतदान करण्यास सांगण्यात येते आणि पतीच्या विजयासाठी त्याही या ठरलेल्या वेळेस मतदान करतात. ही वेळ शुभ असल्याचे सांगण्यात आल्यामुळे व त्यांनी ती साधल्यामुळे आता मोदींच्या मार्गात कोणताही राहु(ल) येऊ शकणार नाही, याची भाजपच्या धर्मभोळ्या कार्यकर्त्यांची खात्री झालेली असते.
कुठल्याही किमतीवर विजय मिळविण्याची ईर्षा बाळगणाऱ्या दोन बाजीगरांच्या अतार्किक वागण्याच्या या दोन तऱ्हा. मात्र निवडणुकांच्या हंगामात केवळ याच दोन व्यक्तींनी असे विलक्षण वर्तन केले, असे नाही. आसेतू हिमाचल अशा प्रकारच्या समजुती आणि शुभ वेळ गाठण्यासाठीच्या हिकमती यांचा एक चित्रपटच उभा राहतो.
राजकारण व चित्रपट ही दोन क्षेत्रे अशी आहेत, की जिथे सर्वात जास्त अनिश्चितता आणि सर्वात जास्त बाजी लागलेली असते. अशावेळेस पदोपदी धोका देणाऱ्या जिवंत माणसांपेक्षा ‘बाय चान्स’ फळणाऱ्या ग्रह-ताऱ्यांवर जास्त विश्वास ठेवल्यास त्यात काय आश्चर्य? निवडणुकीत तर हार-जीतची बाजी मोठी असते, म्हणूनच नरेंद्र मोदींना तिरुपतीचे दर्शन घेण्यासाठी जावे लागते आणि राहुल गांधींना साईबाबांच्या दर्शनासाठी जावे लागते.
एखाद्या कल्पनेच्या साध्यतेची वेळ आल्यास जगातील कुठलीही बाब तिला रोखू शकत नाही, असे फ्रेंच तत्वज्ञ व्हॉल्टेअर म्हणायचा. मात्र हिंदुस्थानातील राजकारण्यांनी आपल्या कल्पनेला साकार करण्याची वेळ ओढून आणण्याची क्लृप्ती हस्तगत केली आहे. म्हणून तर तमिळनाडू व पाँडिचेरीतील सर्वच्या सर्व ४० जागा मिळविण्याची ईर्षा बाळगणाऱ्या जयललिता आपल्या सर्व उमेदवारांना एकाच दिवशी, एकाच मुहूर्तावर अर्ज भरण्यास सांगतात आणि त्याची तामिलीही होते.
तमिळनाडूतीलच मरुमलार्ची द्राविड मुन्नेत्र कळगमचे नेते वैको हे स्वतःला द्राविड चळवळीचे पाईक म्हणवितात आणि म्हणून नास्तिक असल्याचेही जाहीरपणे सांगतात. पण म्हणून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १.४० वाजताचा मुहूर्त गाठण्यात त्यांना आपल्या विचारसरणीशी प्रतारणा करण्याची भावनाही स्पर्शून गेली नाही.
द्राविड चळवळीचे अध्वर्यू म्हणवून घेणाऱ्या एम. करुणानिधींच्या राजकीय वारसदार मुलाने स्टॅलीननेही अशाच प्रकारे विचारसरणीला धाब्यावर बसविले. एका सभेत स्टॅलिन यांचे भाषण ऐकण्यासाठी द्रमुकचे समर्थक बिचारे दोन तासांपेक्षा अधिक वेळ वाट पाहत थांबले तेही तमिळनाडूच्या टळटळीत उन्हामध्ये. का, तर त्यावेळी राहुकाळ चालू होता आणि स्टॅलिनना राहुकाळात बाहेर पडायचे नव्हते! राजकीय विजयाचा प्रश्न असताना विचारसरणीसारख्या क्षुल्लक बाबींकडे कोण लक्ष देणार?
ग्रह-ताऱ्यांची शांती करण्यावर राजकारण्यांचा विश्वास असा, की कोणताही पक्ष किंवा कुठल्याही धर्माच्या नेत्याची त्यातून सुटका नाही. सोनिया गांधींच्या नेतृत्वाला रोम राज्य म्हणून भाजपची मंडळी खिजवत असली, तरी रायबरेलीतून अर्ज भरण्याआधी सोनियांनी दिवंगत काँग्रेस नेते गया प्रसाद शुक्ला यांच्या गुरु भवन या निवासस्थानी जाऊन पूजा केली. गांधी कुटुंबाची ही ४५ वर्षांची परंपरा आहे म्हणे!
इन्फोसिसच्या प्रमुखपदाच्या पुण्याईवर आधी ‘आधार’ प्रकल्प सुरू करणारे आणि दक्षिण बंगळूरमधून काँग्रेसच्या तिकिटावर लढत असलेले नंदन निलेकणी हे माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ, परदेशी विद्यापीठांत शिकलेले. मात्र त्यांनाही ज्योतिषांनी १२.१५ वाजताचाच मुहूर्त काढून दिला होता. मात्र ऐनवेळी एका अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आणि निलेकणी यांना निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अर्धा तास वाट पाहावी लागली. शेवटी त्यांचा मुहूर्त हुकला आणि भाजपच्या लोकांनी मुद्दाम त्या अपक्ष उमेदवाराला पुढे केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. असाच प्रकार राज बब्बर यांच्याही बाबत घडला.
बिहारमधील लालू प्रसाद यादव हे स्वतःला समाजवादी आणि तर्कवादी विचारसरणीचे मसीहा मानतात. १९९० साली मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी स्वतःच्या समर्थकांना धार्मिक ग्रंथ फाडण्याचे आदेश दिले होते. मात्र सत्ता जाताच त्यांचे वर्तनही बदलले. उत्तर प्रदेशातील मिर्जापुर येथील तांत्रिक विभूति नारायण यांच्या आश्रमात पूजा करताना ते आढळले. ही पूजा लालूंनी चारा घोटाळा प्रकरणात मनासारखा निर्णय यावा, म्हणून केली होती. मात्र, सीबीआयने त्यांना अडकावयचे ते अडकवलेच. मुख्यमंत्र्यांचा बंगला सोडल्यानंतर लालूंनी स्वतःच्या बंगल्यात स्वीमिंग पूल बांधायला घेतला. राबडी देवींना छठपूजा करता यावी, हा त्या मागचा उद्देश असल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यांच्या वास्तुतज्ज्ञ सल्लागाराने त्यांना सांगितले, की दक्षिणेकडे असलेल्या या स्वीमिंग पूलमळे त्यांना अडचणी येत आहेत, म्हणून त्यांनी तो बुजवून दुसऱ्या दिशेने करायला घेतला.
आपलं सुदैव, की अजून कोणी संसदेची इमारत वास्तूशास्त्रानुसार नाही, अशी टूम काढलेली नाही. नाहीतर परिवर्तनाच्या लाटेत त्या इमारतीचे स्वरुप बदलण्याची भाषा कोणी केली, तरी आश्चर्य नको!
– देविदास देशपांडे
devidas@didichyaduniyet.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)