सोळाव्या लोकसभेत धुव्वा उडालेल्या काँग्रेस पक्षाला लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. जनहित याचिकांच्या नावाखाली दाखल करण्यात आलेली राजकीय हेतूंनी प्रेरित प्रकरणे आपण हाताळणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
भारताचे सरन्यायाधीश आर.एम. लोढा, न्या. कुरियन जोसेफ आणि आर.एफ. नरीमन यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या वेळी, लोकसभेतील सभापतींचे आदेश हे न्यायालयाच्या कार्यकक्षेत येत नाहीत, असे याचिकाकर्त्यांना सांगितले. एम.एल. शर्मा यांनी याचिका दाखल करण्यापूर्वी योग्य गृहपाठ करणे गरजेचे होते, असे ताशेरेही न्यायालयाने ओढले.