महाराष्ट्रात सेना-भाजप सरकारचा अनुभव घेतल्यानंतर जनतेने सलग तीन वेळा काँग्रेस आघाडी शासनावर विश्वास टाकला. या विश्वासाला तडा जाऊ देता कामा नये. आघाडीतील मित्रपक्षाने त्याचा विचार करणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात अटी-शर्ती टाकल्यास चर्चा होणार नाही. तडजोड सन्मानपूर्वकच झाली पाहिजे, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. येथील महाकवी कालिदास कलामंदिरात रविवारी आयोजित उत्तर महाराष्ट्र विभागीय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. लोकशाहीची परंपरा बाजूला सारून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्देशानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हुकुमशाही पध्दतीने कारभार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून ती धोकादायक असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
मेळाव्यास महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांच्यासह आमदार व पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रात जातीयवादी पक्षांच्या कारभाराचा अनुभव घेतल्यानंतर जनतेने त्यांच्याकडे पाठ फिरवली. नाशिकमध्ये महापालिकेची सत्ता मिळवूनही एका पक्षाने काय दिवे लावले, असा टोला चव्हाण यांनी मनसेचा नामोल्लेख न करता लगावला. महाराष्ट्र आज सर्व क्षेत्रात देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी गुजरात विकासाचा बराच गवगवा झाला. तेव्हा आपण तेथील मुख्यमंत्र्यांना खुली चर्चा करण्याचे आव्हान दिले होते. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना कधी विधानसभेत आमदारांच्या प्रश्नांना उत्तर देत नसत. मंत्र्यांना वेळ घेऊन त्यांची भेट मिळत असे. एक ते दोन दिवसात त्यांनी अनेकदा विधानसभेचे अधिवेशन गुंडाळले. पंतप्रधान झाल्यावरही लोकसभेत मोदी किती प्रश्नांना उत्तरे देतात हे आपण पाहत असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले. काँग्रेस आघाडी शासनाने प्रचंड विकास कामे केली. मागील काही वर्षांत वेगवेगळ्या आपत्तीच्या प्रसंगात १२ हजार कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप करून शेतकऱ्यांच्या मागे उभे राहिले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडी शासनाची कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जागा वाटपाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले. हवेत गेलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जमिनीवर यावे, असे माणिकराव ठाकरे यांनी सुनावले.

मेळाव्यात गोंधळाची परंपरा कायम
काँग्रेसच्या संकल्प मेळाव्यात गोंधळाची परंपरा कायम राहिली. कार्यकर्त्यांंनी थेट मंत्र्यांना जाब विचारण्यास मागे पुढे पाहिले नाही. महसूल मंत्री थोरात बोलण्यासाठी उभे राहत असताना गर्दीतून एका कार्यकर्त्यांने ‘लोकसभेवेळी कुठे गेला होतात’ असा प्रश्न केला. कृषिमंत्री विखे यांनी काँग्रेस आघाडी शासनाने शेतकऱ्यांना किती मदत केली याची माहिती दिली. तेव्हा ‘कार्यकर्त्यांना काय दिले’ असा प्रश्न गर्दीतून उपस्थित झाला. सभागृहातून कोणी व्यासपीठावर जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा एकच कल्लोळ केला जात होता. स्थानिक पदाधिकाऱ्यांना या गोंधळावर नियंत्रण मिळविता आले नाही.

मराठा समाजातील नेत्यांनी एकत्र यावे – राणे
मराठा समाजातील नेत्यांनी आपसात मतभेद न करता एकदिलाने काम करीत समाजातील दुर्बलांना पुढे नेले पाहिजे, असे आवाहन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी रविवारी मराठा महासंघाच्या कार्यक्रमात केले. मराठा व्यक्तीने महत्त्वाकांक्षी असले पाहिजे, खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी, अशी त्याची धारणा असली पाहिजे. खरा ‘मराठा’ आपल्या कृतीतून दिसला पाहिजे, असा उपदेशही राणे यांनी केला. मराठा आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिले, तर सरकार सर्वतोपरी लढेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी दिली. तावडे यांनी मराठा समाजातील तरुणांनी उद्योगाची कास धरण्याबरोबरच नागरी सेवा परीक्षा, पायलट, शास्त्रज्ञ, माहिती-तंत्रज्ञान अशा अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये संधी शोधण्याचे आवाहन केले.