समाजवादी पक्षाला मत न देणारे खरे मुस्लिम नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य करणारे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्यावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसेन यांनी पलटवार केला आहे.
अशा प्रकारची विचारशून्य वक्तव्ये करून अबू आझमी यांनी मुस्लिमांचा ‘पोप’ बनण्याचा प्रयत्न करू नये असे शहनवाज हुसेन यांनी म्हटले आहे.
ते म्हणतात की, “अबू आझमी यांनी आधी स्वत:ची डीएनए चाचणी करुन पहावी आणि अशाप्रकारचे भुरसट वक्तव्ये करून अल्पसंख्यांना फसविण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये. त्यांनी स्वत:ला मुस्लिमांचा ‘पोप’ असल्याचे समजू नये. कोणत्या एका राजकीय पक्षाला मत दिल्याने मतदाराची स्वर्ग किंवा पाताळातील जागा ठरत नाही. उलट, मत दिल्याने समाजपरिवर्तन घडते. याचा विचार त्यांनी करावा.” असेही हुसेन म्हणाले. तसेच मग, मुझफ्फरनगर दंगलीप्रकरणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव आणि अबू आझमी मवाळ का होते? असा सवालही हुसेन यांनी उपस्थित केला आहे.
जे मुस्लिम समाजवादी पक्षाला मत देत नाहीत, ते खरे मुस्लिम नाहीत. त्यांची ‘डीएनए’ चाचणी करून ते संघातील तर नाहीत ना? हे पडताळून पहावे असे वादग्रस्त विधान अबू आझमी यांनी केले होते.