भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी याचा विजय झाल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. याचवेळी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर मोदींचे अभिनंदन केले आहे. यात त्यांनी हा कौल लोकशाहीचा असून, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने यास स्वीकारून एका जबाबदार पक्षाची भूमिका पार पाडवयास हवी असे म्हटले आहे.
जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. त्याबद्दल श्री. मोदी यांचे अभिनंदन! हा कौल आम्ही स्वीकारला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला जे संख्याबळ मिळाले आहे ते पाहता देशात पुढील पाच वर्षे राजकीय स्थैर्य असेल, ही यातील जमेची बाजू आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा कौल स्वीकारून एका जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका पार पाडली पाहिजे व आम्ही ती पार पाडू. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संख्येत तुलनेने फार मोठी घट झालेली नाही. भाजपला चांगले यश मिळाले आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठीचा कौल राज्यातील जनतेने दिला व त्याचा लाभ शिवसेनेलाही मिळाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापुढेही एकजुटीने काम केले पाहिजे व तीच आमची भूमिका राहील. सरकार बरखास्त करण्याची मागणी राज्यातील भाजपने केली असली तरी या मागणीत अर्थ नाही, कारण या निवडणुकीला लोकसभेचा संदर्भ होता. ती केवळ राज्याची निवडणूक नव्हती. त्यामुळे राज्य सरकारने या पराभवाची जबाबदारी घ्यावी या म्हणण्याला काही अर्थ नाही, असे शरद पवार यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आले आहे.