सगळ्यांचाच विजयी होण्याचा दावा
लोकसभा निकालानंतर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे नक्की कोणती भूमिका घेतात याबाबत पक्षांतर्गतबरोबरच अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पक्षाच्या यशाबाबत वेगवेगळे मतप्रवाह असतानाच बहुतांशी उमेदवारांनी आपण निवडून येऊ, असा दावा केल्याने स्वत: पवारही शनिवारी आश्चर्यचकित झाले.
निकालापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांकडून शरद पवार यांनी आढावा घेतला. पक्षाच्या नेत्यांचे सहकार्य, कोणी विरोधात काम केले, काँग्रेसची किती मदत झाली, स्थानिक मुद्दे यांचा आढावा पवार यांनी सर्व उमेदवारांकडून घेतला. तसेच संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांकडे निकालांबाबत विचारणा केली. मोदी लाट होती की अन्य कोणती लाट होती, असा सूचक सवाल त्यांनी केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यावेळी उपस्थित होते. पक्षाच्या उमेदवारांनी आपणच निवडून येऊ, असा दावा केला असला तरी गतवेळच्या तुलनेत फारसा फरक पडणार नाही, असा पक्षाच्या उच्चपदस्थांचा अंदाज आहे.
पक्षाने किमान १२ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, पण ही संख्या पार करण्याबाबत साशंकता आहे.

राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष
भाजपचे पंतप्रधानपदाचे दावेदार नरेंद्र मोदी यांच्याबाबत घेतलेली मवाळ भूमिका, त्याच वेळी राहुल गांधी यांच्यावर कुरघोडी करण्याची संधी न सोडणे यामुळे शुक्रवारच्या निकालानंतर पवार कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यातील आघाडी सरकारचे भवितव्य काय असेल, याबाबत उत्सुकता आहे. पवार यांनी तिसऱ्या आघाडीसाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली असतानाच राहुल गांधी यांनी विरोधी मत व्यक्त केल्याने पवार यांनी शुक्रवारी साताऱ्यात राहुल यांच्या विधानावर अप्रत्यक्षपणे टीका केली. काँग्रेसचा धुव्वा उडाल्यास पवार कोणती भूमिका घेतील याबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही संभ्रम आहे.

राज्यमंत्र्यावर ठपका
परभणी, नाशिकसह काही मतदारसंघांमध्ये पक्षांतर्गत काही नेत्यांनी विरोधी भूमिका घेतल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. परभणी मतदारसंघात राज्यमंत्री फौजिया खान यांनी सहकार्य केले नाही, अशी तक्रार उमेदवाराने केल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.  ठाणे, परभणी, अमरावती, नाशिकसह काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाकडून मदत झाली नाही, असे निदर्शनास आणून देण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्याचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितले.