लोकसभेतील पराभवाच्या पाश्र्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत राज्य विधानसभेच्या निवडणुकीत चांगले यश मिळावे या उद्देशाने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी विविध समाज घटक जवळ येतील या दृष्टीने प्रयोग सुरू केले आहेत.
राष्ट्रवादीत सामूहिक नेतृत्व..
..पण राज्य भारनियमनमुक्त करा – पवार
मराठा आरक्षणाचा मुद्दा काढून गरीब मराठा वा शेतकरी वर्ग राष्ट्रवादीसोबत राहील यावर भर दिला आहे. कारण लोकसभा निवडणुकीत हा वर्ग विरोधकांबरोबर गेला होता. आरक्षणाचा निर्णय झाला तरच हा वर्ग परत येऊ शकतो. मुस्लिम समाज राष्ट्रवादीला फारसा जवळ करीत नाही. या समाजात राष्ट्रवादीबद्दल काहीशी अढी आहे. यातूनच मुस्लिमांना शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, अशी सूचना करीत या समाज आपल्याबरोबर यावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी निधी देण्याची सूचना करीत दलित समाजात संदेश देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. धनगर समाज विरोधात गेल्याने बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य घटले. यामुळेच धनगर समाजाला सवलती देण्यासाठी पुढाकार घेतानाच राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये या समाजाला प्रतिनिधीत्व दिले. लिंगायत समाजाची नाराजी दूर करण्याकरिता त्यांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याची मागणी त्यांनी रेटली आहे. शिष्यवृत्तीच्या मुद्दय़ावरून इतर मागासवर्गीय समाजात नाराजीची भावना आहे. सरकारने या बाबत तात्काळ तोडगा काढण्याची सूचना करीत या समाज दूर जाणार नाही या दृष्टीने प्रयत्न केले आहेत.
व्यापाऱ्यांना खुश करण्याकरिता एलबीटी रद्द करण्याची मागणी केली आहे. या मुद्दय़ावर तडजोड नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. तसेच गेल्या आठवडय़ात सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात छोटय़ा आणि मध्यम व्यापाऱ्यांना व्हॅटमध्ये सवलत किंवा प्रक्रिया अधिक सुटसुटीत करण्यात आली. वीज भारनियमन रद्द करण्याची सूचना करीत ग्रामीण भागातील मतदारांना आपलेसे केले. भारनियमन रद्द करण्याकरिता सरकारच्या तिजोरीवर दरमहा शेकडो कोटी बोजा पडू शकतो.
निवडणुकीनंतर मुख्यमंत्री निवडला जाईल – शरद पवार
हे सारे निर्णय किंवा बदल करताना त्याचे श्रेय राष्ट्रवादीलाच मिळाले पाहिजे यावर पक्षाचा भर आहे. काँग्रेसबरोबर लढून फार काही फायदा होणार नाही हे लक्षात आल्याने पवार यांनी स्वबळावर सर्व जागा लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठीच हे सारे प्रयत्न सुरू झाले आहेत.
मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवार यांना साकडे