नरेंद्र मोदी नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारच गेली २५ वर्षांहून अधिक काळ पंतप्रधानपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी ते प्रयत्न करतात. पवार आपली व्यथा मोदींच्या नावाने मांडत आहेत, असा टोला ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी पवार यांना लगावला. मनसे आणि त्यांच्या नेत्यांच्या नावाने मते मिळत नसल्याने ते मोदींच्या नावावर मते मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीकाही मुंडे यांनी केली. महायुती सत्तेवर आल्यास गारपीटग्रस्तांचे या वर्षीचे पीककर्ज आणि कृषीपंपाचे वीजबिल माफ करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
आष्टी (जि. बीड) येथील माजी आमदार भीमराव धोंडे आणि साहेबराव दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. मुंडे यांनी पवार आणि मनसेवर टीका करीत गारपीटग्रस्तांना अद्याप मदत मिळाली नसल्याचेही सांगितले. मुंडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात स्मारक आणि मराठा आरक्षणाच्या मागणीवरून सरकारने फसविल्याने विनायक मेटेही महायुतीमध्ये सामील झाले. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवर आम्ही ठाम असून भाजपने नारायण राणे समितीपुढेही लेखीस्वरूपात ही मागणी केली होती.  ‘आदर्श’ मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसला राज्यात फटका बसणार आहे. सुरेश कलमाडी यांना एक न्याय, तर चव्हाण यांना वेगळा न्याय काँग्रेसने लावला, अशी टिप्पणीही मुंडे यांनी केली. निवडणूक आयोगाने परवानगी देऊनही गारपीटग्रस्तांना मदतीचे वाटप अद्याप झालेले नाही. न्यायालयाने आता तातडीने मदत पोचविण्याचे आदेश दिले आहेत. पण सरकार देत असलेले हेक्टरी साडेचार हजार रुपयांचे अर्थसाहाय्य अतिशय तुटपुंजे असून ते किमान २५ हजार रुपये मिळाले पाहिजे.