नरेंद्र मोदी यांना अडचणीत आणण्याच्या उद्देशाने महिला पाळतप्रकरणी चौकशी आयोग नेमण्याच्या काँग्रेसच्या खेळीस खो घालून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसवर कुरघोडी केल्याचे मानले जाते. एकाच वेळी काँग्रेसबरोबर आघाडी आणि भाजप किंवा मोदी यांची सहानभुती, असे एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवण्याची किमया राष्ट्रवादीने साधली आहे.
मोदी हे काँग्रेसचे निवडणुकीत प्रतिस्पर्धी असताना मोदी यांच्याबाबत मवाळ भूमिका घेऊन पवार यांनी काँग्रेसला सूचक इशारा दिला. भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, असे सांगत काँग्रेसच्या मतांवर परिणाम होईल, अशी खेळी केली. मोदी यांना अडचणीत आणण्याकरिता पाळतप्रकरणी चौकशी आयोग नेमण्याची घाई काही काँग्रेस नेत्यांना झाली होती. पवार सध्या लंडनमध्ये असून, तेथून त्यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना दूरध्वनीवरून पक्षाचा विरोध कळविला. पवार आणि नॅशनल कॉन्फरन्सचे डॉ. फारुक अब्दुला यांची मैत्री जगजाहीरच आहे. पवार यांच्या इशाऱ्यावरूनच डॉ. अब्दुला यांनी विरोध केल्याचे काँग्रेसच्या गोटात बोलले जाते. पवार यांच्या विरोधामुळेच सरकारला चौकशीचा निर्णय पुढे ढकलणे भाग पडले. पवार यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसच्या गोटात मात्र संशयाचे वातावरण तयार झाले आहे.
गेल्या दहा वर्षांत काँग्रेसला अडचणीत आणण्याचे अनेकदा प्रयत्न पवार यांनी केले. प्रत्येक वेळा काँग्रेस नेतृत्वाला पवार यांच्यापुढे नमते घ्यावे लागले. महागाईच्या मुद्दय़ापासून सरकारच्या कारभाराबाबत पवार यांनी अनेकदा काँग्रेसला सुनावले, पण काँग्रेस नेतृत्वाने पवार यांना अंगावर घेण्याचे टाळले. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी पवार यांचा नेहमीच आदर केला असला तरी राहुल गांधी यांच्या मनात पवार यांच्याबद्दल असलेली अढी लपून राहिलेली नाही.