07 July 2020

News Flash

दुसऱ्या टप्प्यात दिग्गजांचे भवितव्य ठरणार

राज्यातील दुसऱ्या टप्प्यात आज मतदान होणाऱ्या १९ मतदारसंघांमध्ये ३५८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,

| April 17, 2014 01:51 am

राज्यातील दुसऱ्या टप्प्यात आज मतदान होणाऱ्या १९ मतदारसंघांमध्ये ३५८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सुप्रिया सुळे आदी दिग्गजांची कसोटी लागणार आहे. देशात आतापर्यंत चार टप्प्यांत चांगले मतदान झाल्याने राज्यातही मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील (१२), मराठवाडा (सहा) आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या कोकणातील एक अशा १९ मतदारसंघांत उद्या मतदान होत आहे. गारपीटीमुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान या पट्टय़ातच झाले होते. परिणामी शेतकऱ्यांमध्ये असलेल्या नाराजीचा सत्ताधाऱ्यांना काही प्रमाणात फटका बसू शकतो. विरोधकांनी या मुद्दय़ावर सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला असला तरी गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी चार हजार कोटींचे जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचारात भर दिला. सहकार क्षेत्राची पाळेमुळे रुजलेल्या पश्चिम महाराष्ट्रात नरेंद्र मोदी घटक हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभांना चांगली गर्दी झाली होती. याउलट राहुल गांधी यांच्या सभांना तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण या दोघांनी सर्व मतदारसंघांचा दौरा करून मोदी यांनाच लक्ष्य केले होते. सत्ताधाऱ्यांच्या सर्व जाहीर सभांमध्ये मोदी हा एकमेव मुद्दा होता.
पहिल्या टप्प्यात विदर्भातील दहा मतदारसंघांमध्ये सरासरी ६५ टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते. देशात आतापर्यंत झालेल्या चार टप्प्यात सर्वत्रच चांगले मतदान झाले. यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात मतदान वाढेल, अशी चिन्हे आहेत. विदर्भ किंवा देशाच्या अन्य भागांमध्ये अल्पसंख्यांक मतदानाचे प्रमाण वाढले होते. मराठवाडय़ातही अल्पसंख्याक मतदान वाढावे, असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न आहे.
उद्या मतदान होणाऱ्या मतदारसंघांपैकी सर्वाधिक लक्षणीय लढत ही रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात होणार आहे. निलेश राणे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतलेली असहकाराची भूमिका, काही काँग्रेसजनांचा विरोध यामुळे पुत्राला निवडून आणण्यासाठी उद्योगमंत्री नारायण राणे यांची सारी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बीडमध्ये भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे सुरेश धस यांनी जोर लावला. मराठा विरुद्ध वंजारी असा जातीय रंग या मतदारसंघात देण्यात आला. मुंडे यांना राज ठाकरे यांचा पाठिंबा घ्यावा लागल्याने मुंडे यांच्यासाठी लढाई सोपी नाही हाच संदेश त्यातून गेला.

सत्तारुढ आघाडीची भिस्त आजच्या मतदारसंघांवरच!
शहरी भागात प्रभावी ठरलेला नरेंद्र मोदी घटक, विदर्भात कल विरोधात गेल्याची शंका, मनसे घटक फारसा प्रभावी ठरत नसल्याने मुंबई, ठाण्यातील यशाबाबत साशंकता या पाश्र्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यातील १९ मतदारसंघांवरच काँग्रेस-राष्ट्रवादीची भिस्त आहे.  २००९च्या निवडणुकीत या पट्टय़ातून काँग्रेसचे सहा तर राष्ट्रवादीचे चार असे दहा खासदार निवडून आले होते. शिवसेनेचे पाच तर भाजप आणि अपक्ष प्रत्येकी दोन विजयी झाले होते.  राष्ट्रवादीची सारी मदार ही पश्चिम महाराष्ट्रातील सात मतदारसंघांवर आहे. गेल्या वेळी नगर, मावळ, कोल्हापूर, शिरुर या  हक्काच्या जागा राष्ट्रवादीला गमवाव्या लागल्या होत्या. यंदा शिरुरचा अपवाद वगळता अन्य तीन जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा राष्ट्रवादीने निर्धार केला आहे.मुस्लिम मतदान वाढल्याने सत्ताधाऱ्यांसाठी तेवढीच समाधानाची बाब ठरली. यामुळेच मुस्लिम मतदार असलेल्या भागांमध्ये जास्तीत जास्त मतदान होईल अशी खबरदारी घेण्याची सूचना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपापल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आज राज्यातील मतदान..
* पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, तळकोकण
* एकूण उमेदवार ३५८
* २०१ अपक्ष; २४ महिला उमेदवार
* सव्वातीन कोटी मतदार
* एक कोटी ६९ लाख ५४ हजार महिला
* एक कोटी ५३ लाख ७७ हजार पुरुष
* ३०६ मतदार इतर श्रेणीतील
* ९५ हजार मतदार सेवा क्षेत्रातील

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2014 1:51 am

Web Title: shinde munde chavan supriya sule in fray as maharashtra goes to poll for 2nd phase
Next Stories
1 काँग्रेसच्या पाठिंब्यावर तिसऱ्या आघाडीची सत्ता
2 महत्त्वाचे : पक्षांतर्गत विरोधकही प्रिया दत्त यांच्या प्रचारात
3 धूळ उडू नये म्हणून मून मून सेन आणि तिच्या मुलींसाठी रस्त्याची पाण्याने धुलाई!
Just Now!
X