शिवसेना-भाजप-रिपब्लिकन पक्ष महायुतीचा मेळावा २३ फेब्रुवारीला डोंबिवलीत होणार असून कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेला उमेदवाराची मात्र शोधाशोध करावी लागत आहे. तर भाजपला हा मतदारसंघ हवा असून शिवसेनेची मात्र अदलाबदलीसाठी तयारी नाही.
इचलकरंजी आणि बीडनंतर महायुतीच्या मेळाव्यासाठी डोंबिवलीची निवड करण्यात आली. मात्र दोन वर्षांपूर्वी शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शिवसेनेच्या एखाद्या नेत्याने मतदारसंघाची बांधणी केल्याचे दिसून येत नाही.
शिवसेनेचे जिल्हा संपर्क नेते आमदार एकनाथ शिंदे यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची चर्चा असली तरी ते दिल्लीला जाण्यास फारसे इच्छुक नसल्याचे समजते. या मतदारसंघात शिवसेनेकडे तगडा उमेदवार नाही. कल्याण-डोंबिवलीत भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव आहे. त्यामुळे ही जागा आपल्याला मिळावी, अशी भाजपची मागणी आहे. त्याबदल्यात भिवंडी किंवा अन्य जागा भाजपकडून दिली जाऊ शकते.
परांजपे राष्ट्रवादीत गेल्यामुळे या मतदारसंघात त्यांना टक्कर देता येईल, असा प्रबळ उमेदवार भाजपला द्यावा लागेल.
आमदार रवींद्र चव्हाण यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक उपक्रम व कार्यक्रम जिल्हास्तरापर्यंत राबविली. एकाच दिवशी जिल्ह्यात अनेक ठिकाणी महारक्तदान शिबीरासह वेगवेगळ्या मार्गाने ते मतदारसंघात कार्यरत आहेत. हा मतदारसंघ भाजपला मिळाल्यावर उमेदवाराची निवड करता येऊ शकेल, असे काही नेते या मतदारसंघात भाजपकडे असल्याचे सूत्रांनी सांगितले.