लोकसभेत देशात व महाराष्ट्रात भाजपला मिळालेले यश लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपमधील जागावाटपाचे सूत्र बदलण्याचा आग्रह भाजपच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. भाजपच्या नेत्यांनी याबाबत अद्यापि कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसली तरी महाराष्ट्रात शिवसेना हाच भाजपचा मोठा भाऊ आहे व राहणार, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेने घेतली आहे. आवश्यकतेनुसार काही अदलाबदल होऊ शकतात मात्र जागावाटपाचे गणित कायम राहील, असेही सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला २३ जागा मिळाल्या आहेत. या लोकसभा मतदारसंघात येणारे विधानसभा मतदारसंघ तसेच राज्यातील एकूण विधानसभांच्या जागांपैकी सेनेच्या वाटय़ाला येणाऱ्या जागांच्या तुलनेत अनेक ठिकाणी भाजपला जास्त मते मिळाली असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला समसमान जागा मिळाल्या पाहिजे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने कमी जागा लढवूनही शिवसेनेपेक्षा जास्त जागा जिंकल्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद भाजपच्या ताब्यात गेले. जागावाटपाच्या सूत्रात आता बदल झाला पाहिजे, अशी मागणी भाजपमधून पुढे येत असली तरी अशी कोणतीही अधिकृत मागणी भाजपच्या नेत्यांनी केली नसल्याचे सेनेच्या सूत्रांनी सांगितले. याबाबत खासदार संजय राऊत यांना विचारले असता, लोकसभेत मोठय़ा भावाची भूमिका ही भाजपची तर विधानसभेत शिवसेना हाच भाजपचा मोठा भाऊ असणार. ही भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी तसेच लालकृष्ण आडवाणी यांनीच ठरवली आहे. याच भूमिकेचा आदर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने केला. तसाच विधानसभेतही भाजप तो करेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.  यावेळी लोकसभेत शिवसेनेच्या जागा ११ वरून १८ एवढय़ा वाढल्या असून सेनेच्या मतांमध्येही मोठय़ा प्रमाणात वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे भाजपच्याही जागा वाढल्या आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांना जागा वाढाव्या असे वाटणे स्वाभाविक आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीची सत्ता येणे हे जास्त महत्त्वाचे आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

सेना-भाजप युती हिंदुत्वाच्या वैचारिक बैठकीवर बनली आहे. लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकांमध्ये यापूर्वीही उलटसुलट निकाल लागले आहेत. त्याचा परिणाम युतीवर कधीही झालेला नाही.
-संजय राऊत ,शिवसेना नेते