शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीमध्येच शिवसेनेतून बाहेर पडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वळचणीला जात मंत्रिपदे पदरात पाडून आपल्या आणि आपल्या कुटुंबियांना सातत्याने विजयी करणाऱ्यांचा सोळाव्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या शिवसेनेने पुरता सफाया केला.
शिवसेनेतून बाहेर पडून राष्ट्रवादीत गेलेले छगन भुजबळ यांचा नाशिक लोकसभा मतदारसंघात मनसेमधून शिवसेनेत जाऊन लढलेल्या हेमंत गोडसे यांनी पराभव केला. ठाणे लोकसभा मतदारसंघात गणेश नाईक यांचे चिरंजीव व खासदार संजीव नाईक यांना शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी धूळ चारली तर शिवसेनेचे त्यातही उद्धव ठाकरे यांचे शत्रू क्रमांक एक असलेले उद्योगमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांना कोकणात जाऊन शिवसेनेने पराभूत केले. शिवसेनेचे विनायक राऊत यांनी निलेश यांच्या केलेल्या पराभवामुळे राणे यांचे कोकणातील स्थानच मुळापासून हादरले आहे. नारायण राणे, छगन भुजबळ आणि गणेश नाईक यांची ‘दादागिरी’ उद्धव यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत संपवली हे या निवडणुकीचे सेनेच्या दृष्टीने वैशिष्टय़ आहे. याशिवाय शिवसेनेतून फुटून राष्ट्रवादीत गेलेले आनंद परांजपे हे कल्याण-डोंबिवली मतदारसंघात सेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्यासमोर थेट तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. ठाणे जिल्ह्य़ातील गणेश नाईक यांचे साम्राज्य, नाशिकमधील भुजबळांचे साम्राज्य आणि कोकणातील नारायण राणे यांची दादागिरी उद्धव यांच्या शिवसेनेने संपवली.