लोकसभा निवडणुकीत विजय मिळो अथवा न मिळो, काँग्रेस पक्षात या निवडणुकीनंतर मोठे बदल पाहावयास मिळतील, असे केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी म्हटले आहे.युवकांना सक्षम केले पाहिजे, त्यांना अधिकाधिक अधिकार दिले पाहिजेत, त्यामुळे निवडणुकीचे निकाल काहीही लागले तरी पक्षाचा चेहरामोहरा बदलेलच, असेही रमेश म्हणाले. काँग्रेसने ३० ते ४० वर्षे वयोगटांतील बहुसंख्य उमेदवारांना तिकीट दिले आहे, आता कात टाकून नव्या रूपातील काँग्रेस अस्तित्वात आणण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या रूपाने आपल्याला नवे नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे ज्येष्ठांनी पक्षात राहूनच तरुण रक्ताला जास्त वाव देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. आपल्याला भरपूर भ्रमंती करावयाची असल्याचेही ते म्हणाले.

मरांडी यांना नोटीस
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत आपला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील विविध चर्चमधील पाद्री आणि बिशप यांना आवाहन केल्याबद्दल झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांच्यावर निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी मरांडी यांना बुधवार सकाळपर्यंतची मुदत देण्यात आली असून त्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे संकेत आयोगाने दिले आहेत. मते मिळविण्यासाठी जातीवर अथवा जातीयवादी भावनांवर आधारित आवाहन करता येत नाही, असे आचारसंहितेत नमूद असून मरांडी यांनी त्याचा भंग केल्याचे आयोगाने नोटिशीत म्हटले आहे.

गिरिराज यांना दिलासा नाहीच
बोकारो (झारखंड) : भाजपचे नेते गिरिराज सिंग यांचा अटकपूर्व जामीनअर्ज सोमवारी येथील स्थानिक न्यायालयाने फेटाळून लावला. तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल गिरिराज सिंग यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरण्ट जारी केले आहे. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश बिपीन बिहारी यांनी गिरिराज यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यापूर्वी उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांनी गिरिराज यांच्याविरुद्ध वॉरण्ट जारी केले होते.

आचार संहिताभंगाचे गुन्हे आगीत जळाले!
मुंबई : गेल्या तीन लोकसभा निवडणुकांदरम्यान दाखल झालेल्या आचार संहिताभंगाच्या गुन्ह्य़ांसदर्भातील सर्व कागदपत्रे मंत्रालयाच्या आगीत जळून खाक झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी गेल्या तीन लोकसभा निवडणुकांदरम्यान आचार संहिताभंगाचे किती गुन्हे दाखल झाले, किती प्रकरणे प्रलंबित आहेत, किती खासदारांवर कारवाई करण्यात आली, आदी माहिती, माहिती अधिकारात मागितली होती. मात्र २१ जून २०१२ रोजी मंत्रालयास लागलेल्या आगीत ही सर्व माहिती जळाली असून, आयोगाकडे याबाबतची कोणताही माहिती उपलब्ध नसल्याचे सामान्य प्रशासन विभागाने गलगली यांना कळविले. या आगीनंतर सर्व फाईल आणि अभिलेखांची पुनर्बाधणी करण्याचे आदेश सरकारने दिले होते. मात्र निवडणुकीशी संबंधित या फायलींची पुनर्बाधणीच करण्यात आलेली नसून, सामान्य प्रशासन विभागाच्या बेफिकिरीमुळे हा प्रकार घडल्याचा आरोप गलगली यांनी केला आहे.