लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागल्याचे शल्य अद्यापही काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात आहे. त्यामुळेच पक्षाच्या अध्यक्षपदापासून ते जिल्हा पातळी स्तरापर्यंत संघटनात्मक निवडणुका घेतल्या पाहिजेत, अशी सूचना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घुफरन-ए-आझम यांनी केली आहे. पक्षातील सर्व पदांच्या निवडणुका घेतल्यानंतरच सर्व कार्यकर्ते पुन्हा एकत्रित येतील. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना या बाबत आपण पत्र लिहिले आहे, मात्र अद्याप त्याला उत्तर आलेले नाही. आपण जेव्हा अशा आशयाचे पत्र लिहिले तेव्हा आपण भाजपमध्ये जात असल्याच्या वावडय़ा उठल्या, मात्र त्याला काहीही आधार नाही, असेही ते म्हणाले. जवळपास गेल्या ४० वर्षांपासून आपण अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सदस्य आहोत आणि आपण भाजपमध्ये कधीही जाणार नाही.

‘एजीपी’ अध्यक्षपदाचा महंत यांचा राजीनामा
गुवाहाटी:लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाला पत्कराव्या लागलेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून आसाम गण परिषदेचे (एजीपी) नेते प्रफुल्लकुमार महंत यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीमाना दिला आहे. पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत महंत यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. लोकसभा, पंचायत आणि महापालिकांच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे ते म्हणाले.पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष अतुल बोरा (कनिष्ठ) यांच्याकडे राजीनामा देऊन महंत पक्षाच्या मुख्यालयातून निघून गेले. अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी आपण आमदार म्हणून काम करीत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चारा घोटाळा : लालूप्रसाद यांची जबानी नोंदविली
रांची:राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी चारा घोटाळाप्रकरणी सोमवारी विशेष सीबीआय न्यायालयात जबानी नोंदविली. जवळपास ९५० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात आपल्याला गोवण्यात आले असल्याचे या वेळी लालूप्रसाद म्हणाले.आपण निष्पाप असल्याचा दावाही त्यांनी केला आणि एकदा या प्रकरणी दोषी ठरविल्यावर आणखी किती वेळा आपल्याला त्याच खटल्यासाठी दोषी ठरविण्यात येणार आहे, असा सवालही त्यांनी केला.

‘राजद’शी संभाव्य आघाडीला जद(यू) आमदाराचा विरोध
पाटणा: बिहार विधानसभेच्या निवडणुकीसाठी जद(यू) आणि राष्ट्रीय जनता दलाची (राजद) आघाडी होणार असल्याचे संकेत मिळत असतानाच जद(यू)च्या आमदाराने त्याविरुद्ध दंड थोपटले आहेत. पक्षाकडे पत्र पाठवून जद(यू)च्या आमदाराने याला ठाम विरोध दर्शविला आहे. मात्र भाजपला विरोध करण्यासाठी राजदसह अन्य पक्षांशी आघाडी होण्याची शक्यता आहे, असे पक्षाचे नेते नितीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे. जद(यू)चे प्रदेशाध्यक्ष वसिष्ठ नारायण सिंग यांना पत्र पाठवून आपण या आघाडीला ठाम विरोध दर्शविला आहे. लालूप्रसाद यादव यांच्या जंगलराजला कंटाळून आपण जद(यू) पक्षाची स्थापना केली आहे, असे नालंदा जिल्ह्य़ातील इस्लामपूरचे आमदार राजीव रंजन यांनी म्हटले आहे.

कामगार विभागाच्या पुस्तिकेवर नितीशकुमार यांचे छायाचित्र
पाटणा : कामगार विभागाच्या पुस्तिकेत बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्याऐवजी माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचे छायाचित्र प्रकाशित करण्याच्या कृतीला भाजपने हरकत घेतली.या पुस्तिकेत २०१३-१४ मध्ये साध्य केलेली उद्दिष्टे आणि २०१४-१५ या वर्षांत कोणत्या बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे, ते स्पष्ट करण्यात आले आहे.  नितीशकुमार यांचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आल्याबाबत विरोधी पक्षनेते नंदकिशोर यादव यांनी सरकारकडून स्पष्टीकरणाची मागणी केली.