काँग्रेस नगरसेवक सुधाकर पांढरे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या कैलासनगर प्रभाग पोटनिवडणुकीत माजी महापौर मंगला निमकर यांचा शिवसेनेच्या बंडू खेडकर यांनी दारुण पराभव केला. पालकमंत्री व काँग्रेस पदाधिकाऱ्यांना या निकालाने चांगलाच धक्का दिला. नांदेडचे प्रथम महापौर सुधाकर पांढरे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. पक्षांतर करताना पांढरे यांनी सेनेत प्रवेश करण्यापूर्वीच आपला राजीनामा महापालिका आयुक्तांकडे सादर केला. काँग्रेसने या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावताना माजी महापौर मंगला निमकर यांना रिंगणात उतरवले, तर सेनेने यापूर्वी निवडणुकीत पराभूत झालेल्या खेडकर यांनाच संधी दिली.  खेडकर यांना २ हजार २९३, काँग्रेसच्या निमकर यांना १ हजार ८६६, तर राष्ट्रवादीचे शेख अफसर शेख बाबू यांना ११, अपक्ष उमेदवार शेख अस्लम यांना १०९ व इंडियन मुस्लीम लीगच्या वाजिद अन्वर यांना १३ मते मिळाली.
पश्चिम बंगालचे राज्यपाल नारायणन यांचा राजीनामा
नवी दिल्ली:पश्चिम बंगालचे राज्यपाल एम. के. नारायणन यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. केंद्रात एनडीएचे सरकार आल्यापासून राज्यपालपदाचा राजीनामा देणारे ते चौथे राज्यपाल आहेत. यूपीए सरकारने नियुक्त केलेल्या काही राज्यपालांनी पायउतार व्हावे, असा प्रयत्न एनडीएकडून सुरू झाल्याने नवा वाद पेटला आहे.  नारायणन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. नारायणन यांची अलीकडेच ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदीप्रकरणी सीबीआयने साक्षीदार म्हणून चौकशी केली होती.एम. के. नारायणन हे ४ जुलै रोजी अधिकृतपणे आपला पदभार सोडणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.
बिहार विधानसभेत भाजपच्या सदस्यांची घोषणाबाजी
पाटणा:लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्य पोहोचत नसल्याच्या मुद्दय़ावरून बिहार विधानसभेत भाजपच्या सदस्यांनी सोमवारी जोरदार गोंधळ घातला. परिणामी अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांना सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.गरिबांना नव्या शिधापत्रिका मिळत नसून गेल्या पाच महिन्यांपासून त्यांना अन्नधान्यही मिळत नाही, असा मुद्दा शून्य प्रहराला विरोधी पक्षनेते नंदकिशोर यादव यांनी उपस्थित केला. ही गंभीर बाब आहे, त्यामुळे सरकारने त्वरित उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. यादव यांचे भाषण संपताच भाजपच्या सदस्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आणि सभागृहात फलक फडकाविले. मात्र सदस्यांनी घोषणाबाजी सुरू ठेवल्याने चौधरी यांनी सभागृह तहकूब केले.
देशमुखांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा धुव्वा
लातूर  : राज्यमंत्रिपद मिळाल्यानंतर अमित देशमुख यांनी लातूर महापालिकेतील प्रभाग तेराच्या पोटनिवडणुकीसाठी तब्बल आठ बैठका घेऊनही काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला. दरम्यान, पोटनिवडणुकीतील पराभव लक्षात घेऊन देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष सुधीर धुत्तेकर यांनी केली. या निवडणुकीत भाजपने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार डॉ. विजय अजनीकर विजयी झाले.काँग्रेस जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे या प्रभागातून निवडून आले होते, मात्र त्यांच्या जातप्रमाणपत्राविषयी न्यायालयात याचिका दाखल झाली व त्यांचे मागासवर्गीय प्रमाणपत्र रद्द ठरले. पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला होता. त्यामुळे त्यांनी अपक्षास पािठबा दिला होता. डॉ. अजनीकर यांना १ हजार ४४२, तर काँग्रेस उमेदवार प्रशांत कांबळे यांना १ हजार २८६ मते मिळाली.
शेकापचा मुंबई पालिकेत चंचूप्रवेश
मुंबई :हानिफाबी या नगरसेविकेच्या निधनानंतर प्रभाग १३५मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार खैरनुसा अकबर हुसेन विजयी झाल्या आहेत. या विजयामुळे मुंबई महानगरपालिकेत शेकापने प्रथमच चंचूप्रवेश करण्यात यश मिळवले आहे.
या निवडणुकीत खैरनुसा अकबर हुसेन यांना ७,८९३ मते मिळाली. अपक्ष उमेदवार सबिरा बेगम बक्तावर शाह यांना दुसऱ्या क्रमांकाची ३,३८३ मते मिळाली.  ‘मुंबई शहराचा प्रभारी म्हणून नेमणूक झाल्यावर या पोटनिवडणुकीत यश मिळवण्यासाठी आम्ही पद्धतशीर प्रयत्न केला. या विजयामुळे आमचे मनोबल वाढले असून विधानसभेच्या ३६ जागांपैकी १५ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे,’ असे शेकापचे आमदार विवेक पाटील यांनी सांगितले.
‘काँग्रेसकडून मुस्लिमांचे लांगूलचालन नाही ’
नवी दिल्ली:काँग्रेस नेते ए. के. अॅण्टनी यांनी अल्पसंख्याकांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे पक्षात अस्वस्थता  आहे. लोकसभेच्या २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत २८ पैकी १२ मुस्लीम उमेदवार निवडून आले. त्यापैकी यूपीए-२ मध्ये एकाला मंत्रिपद देण्यात आले आणि तेही राज्यमंत्रिपद होते, हे अल्पसंख्याकांचे लांगूलचालन आहे का, असा सवाल काँग्रेसचे नेते अनिल शास्त्री यांनी केला आहे.