भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे शेतकरी व सामान्य माणसाच्या विरोधात असून त्यांच्यामुळे गुजरातची नव्हे तर उद्योगपतींचीच अधिक  प्रगती झाली आहे, अशी टीका ‘आम आदमी पक्षा’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी केली. देशाच्या प्रगतीसाठी गुजरात आदर्शवत् आहे, हा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा दावा तपासण्यासाठी ते चार दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.
नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आपण निवडणूक लढणार का, असे दौऱ्याच्या सुरुवातीलाच पत्रकारांनी विचारता केजरीवाल यांनी, याचा विचार ओघाने नंतर करू, असे सांगितले. ते म्हणाले, निवडणूक लढणे किंवा न लढणे, हा महत्त्वाचा मुद्दा नाही. याआधी मोदी गुजरातबाहेर कुठेही उभे राहिले तरी त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करण्याची घोषणा आम आदमी पक्षाने केली होती. राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा घोटाळ्यातून वाचविण्यासाठीच शीला दीक्षित यांना केरळचे राज्यपालपद दिले गेल्याचा आरोप त्यांनी केला. आपण दिल्लीत धरणे दिले तेव्हा भाजपने आपल्यावर टीका केली होती. आता त्यांचेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान मंत्रिमंडळासह गुरुवारी भोपाळ येथे केंद्राविरोधात धरणे आंदोलन करणार आहेत. त्याबद्दल भाजपने मौन का धरले आहे, असा सवालही त्यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत मेधा पाटकर यांना उमेदवारी दिल्यावरून केजरीवाल हे गुजरातविरोधी असल्याचा आरोप करीत पाटण येथे त्यांना काळे झेंडे दाखवले गेले.  नर्मदा विरोध म्हणजे गुजरातविरोध असा गावकऱ्यांचा दावा होता.
अटकेची चर्चा
हा दौरा सुरू होताच केजरीवाल यांना निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने पोलिसांनी ताब्यात घेऊन राधणपूर पोलीस ठाण्यात नेले. प्रत्यक्षात, त्यांना अटक झाली नव्हती तर आचारसंहितेची माहिती देण्यापुरते त्यांना थांबविले  असा दावा पोलिसांनी केला. केजरीवाल यांनी मात्र हा सगळा मोदी यांचाच कट होता, असा आरोप केला.