04 August 2020

News Flash

सूर्यकांता पाटील राष्ट्रवादीतून बाहेर

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापासून ते पक्षाचे नवे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंतच्या पक्षनेत्यांवर यथेच्छ टीका केल्यानंतर माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आपला

| August 25, 2014 02:05 am

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापासून ते पक्षाचे नवे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंतच्या पक्षनेत्यांवर यथेच्छ टीका केल्यानंतर माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आपला १५ वर्षांचा प्रवास थांबविला.
  काँग्रेसचे माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी सुरू केलेल्या राजकीय गडगडाटात भर घालत श्रीमती सूर्यकांता पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह इतर जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिल्याची घोषणा वार्ताहर बैठकीत केली. पक्ष सोडल्यानंतर कोठे जायचे, हे ठरले नसल्याचे त्यांनी अधिकृतपणे सांगितलेले नाही. मात्र, त्या भाजपाकडे ओढल्या गेल्याची चर्चा आहे. १९७० च्या दशकात वृत्तपत्र काढून त्याचे प्रकाशन ग. वा. बेहरेंच्या हस्ते करणारी व काँग्रेस विचारसरणीने पूर्णत: भारलेली महिला कार्यकर्ता आता सत्तरीच्या उंबरठय़ावर भाजपकडे झुकल्याची चर्चा आहे. सकाळी अन्य एका कार्यक्रमात त्यांनी बेहरेंचे स्मरण केले होते, हे विशेष!
१९९९ साली पक्ष स्थापन झाला तेव्हा मी एकटीच या नव्या पक्षात दाखल झाले आणि आता एकटीच बाहेर पडत आहे, असे स्पष्ट करून आपल्या पुढील राजकीय निर्णयाची माहिती जाणून घेण्यासाठी तीन-चार दिवस थांबण्याचा सल्ला त्यांनी पत्रकारांना दिला.
लोकसभा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ च्या नेत्यांनी सूर्यकांताबाईंची उमेदवारी हिरावून घेताना, हिंगोली मतदारसंघ काँग्रेसला सोडून दिल्याने त्या नाराज होत्या. तेव्हापासून बाळगलेले राजकीय मौन नांदेड मुक्कामी सोडताना श्रीमती पाटील यांनी शरद पवार, प्रफुल्ल पटेल या केंद्रीय नेत्यांसह सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टोलेबाजी केली होती. रविवारी वार्ताहर बैठकीत पक्ष सोडण्याचा निर्णय जाहीर करताना त्यांनी टीका टाळली. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने उमेदवारी नाकारल्यानंतर ‘अशा दगाबाज नेत्यांचा पक्ष सोडून दे’ असा सल्ला सूर्यकांताबाईंना त्यांच्या मुलीने दिला होता. तो पाच महिन्यांनंतर अमलात आणताना आता माघार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांचे निकटचे सहकारी अरुण कुलकर्णी, सुनील सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2014 2:05 am

Web Title: suryakanta patil leave ncp
Next Stories
1 घोटाळ्यातून नावे वगळण्यासाठी दबाव
2 बहिष्कार हा सरकारचा पळपुटेपणा
3 निवडणुकीची घोषणा या आठवडय़ात?
Just Now!
X